

माणगाव (रायगड) : कमलाकर होवाळ
माणगाव तालुक्यातील निजामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीज खंडित समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गौरी गणपती गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला असून संतापाची लाट उसळली असून निजामपूर विज वितरण कंपनी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सचिन गुळवे व निजामपूर शहरात असणार्या वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांची तात्काळ बदली करा अशी मागणी निजामपुरातील नागरिकांकडून होत आहे.
गेली सहा महिन्यापासून निजामपूर शहर व परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. निजामपूर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक चौकशीसाठी फोन करतात मात्र ते फोन एम एस सी बी चे कर्मचारी उचलत नाहीत. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने या कार्यालयात विशेषता रात्रीच्या सुमारास कर्मचारी उपस्थित नसतात. निजामपूर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता हे निजामपूर येथे मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता ते माणगाव येथे वास्तव्य करतात तसेच निजामपूर वीज कार्यालयातील काही कर्मचारी हंगामी म्हणून काम करतात त्यामुळे त्यांनाही काम करताना मर्यादा पडतात. त्यामुळे रात्री अप रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास निजामपूर येथील कर्मचार्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. नागरिकांनी या कर्मचार्याकडे चौकशी करण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांच्या सोबत कार्यरत असलेले वायरमन देखील फोनवर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्येची कारणे किंवा दुरुस्तीची माहिती वेळेवर मिळत नाही.
गणेशोत्सवासारख्या काळात नागरिकांना वीज खंडितेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. निजामपूरकरांना त्रास देणार्या अधिकार्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल. खंडित वीज पुरवठ्याची समस्या त्वरित निकाली न काढल्यास आणि संबंधित कनिष्ठ अभियंता यांची बदली न केल्यास निजामपुरात मोठे आंदोलन उभारले जाईल. याबाबत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्याकडेही तक्रार करणार.
पवन कोळवणकर, शिवसेना शाखाप्रमुख, निजामपूर
गुळवे हे निजामपूरमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता माणगाव येथे वास्तव्य करत असल्यामुळे, निजामपूर शहर व परिसरात विजेचा बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे रात्रभर नागरिकांना अंधारात राहावे लागते. निजामपूर भागातील छोटे मोठे व्यावसायिक या विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. तर अनेक ग्राहकांच्या घरातील इन्वर्टर, टीव्ही, एलईडी बल्ब, ट्यूब, फ्रिज, तसेच विजेवर चालणारी उपकरणात बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सणउत्सव काळात मुलांचे अभ्यास, छोटे मोठे व्यवसाय, पिठचक्की, ऑनलाइनची कामे, झेरॉक्स सेंटर, हॉटेल व्यवसायिक, तसेच धार्मिक कार्यक्रम विस्कळीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रोहा येथील विभागीय वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रारी केल्या असून निजामपूर येथील कनिष्ठ अभियंत्याची तातडीने बदली करावी अशी मागणी केली असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.