

जेएनपीए (रायगड ) : विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील खोपटे गावातील शिवगौरा उत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी या उत्सवाची सर्व भाविक भक्त मोठ्या ऊत्साहाने वाट पाहत असतात. उरणच्या खोपटा गावातील पाटील पाड्यात शिवकृपा गौरा मंडळाच्या माध्यमातून साजरा होणारा शिवगौरा उत्सव यावर्षी ८४ व्या वर्षीचा देखावा म्हणून वानर सेनेने प्रभू श्री रामाना श्रीलंकेत जाण्यासाठी जो समुद्रातून रामसेतू तयार केला होता तो रामसेतू बांधतांना साक्षात समुद्र देव प्रसन्न झाल्याचा प्रसंग साकारण्यात आला आहे.
समुद्र देवाला प्रसन्न करून रामसेतू बांधण्यात आला होता अशी आख्यायिका आहे. त्यावर आधारीत रामसेतू बांधण्यापूर्वी प्रभू श्री राम हे समुद्र देवाला प्रसन्न करतानाचा देखावा साकारला गेला आहे. या देखाव्यात प्रभू श्री राम, बंधू लक्ष्मण, समुद्र देव आणि हनुमंत राया अशा चार मुर्त्या साकारल्या गेल्या आहेत. या सर्व मूर्त्या खोपटा गावातील म्हात्रे पाड्यातील भाया पेंटर यांच्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत.
तर मुख्य पूजनाची मुर्ती असलेली शिवमूर्ती ही श्री गणेश आणि पार्वती मातेसह अतिशय हुबेहूब साकारण्यात आली आहे. यावर्षी गौरा मंडळाचे ८४ वे वर्ष असल्याने पहिल्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी सकाळी ७वाजता शिवागौरा आगमन झाले आहे. २ तारखेला सकाळी ७ वाजता आरती दिवसभर दर्शन आणि रात्री ८ वाजता जॉनी रावत यांचा ऑर्केस्ट्रा सुपर हिट हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दिवसभरात भक्तिमय कार्यक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. रात्री ९ वाजता ह. भ. प. अलकाताई सतीश वाल-हेकर नसरापूर पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आस्वाद घेता येणार आहे.