

अलिबाग (रायगड) : गौरी-गणपती विसर्जनानंतर रायगडात आपल्या गावी आलेल्या कोकणवासियांचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटीने कंबर कसली आहे रायगड विभागातील आठ आगारांमधून एसटीने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. दोन दिवसांसाठी साडेसहाशे बसेसची व्यवस्था केली आहे. सध्या स्थानकांमध्ये गर्दी होत आहे.
गणेशोत्सव काळात सात दिवस गणरायाची मनोभावे पूजाअर्चा, आरती, भजन करून शेवटच्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह धरून चाकरमानी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यासाठी एसटीच्या सर्वच बसस्थानकात प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली. चाकरमानी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाकडून बसस्थानकातून एसटीची जादा वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, उपनगर, ठाणे, डोंबिवली परीसरात राहणारे चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत. काहीनी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करून मुंबई गाठली आहे. मात्र गौरीच्या सणासाठी थांबलेले चाकरमानी अजूनही आपल्या गावी आले होते. यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने ५ हजारांहून अधिक बसेस सोडल्या होत्या. विविध राजकीय पक्षांनीही खाजगी बसेसमधून त्यांची गावी येण्याची व्यवस्था केली होती. एसटीच्या उत्तम नियोजनामुळे यंदा चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. आता चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
गौरीपूजन झाल्यानंतर अनेकांनी मुंबईची वाट धरली आहे. त्यामुळे रायगडमधील बसस्थानकांतील वर्दळ वाढली आहे. संध्याकाळी गौरी गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर अनेकजण खाजगी वाहनांनी मुंबईकडे रवाना झाले. बुधवारी ३ तारखेला तिखटाचा सण करून मुंबईकडे निघणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात कुठलीही गैरसोय होवू नये यासाठी एसटीने नियोजन केले आहे. रायगड जिल्हयातील आठ आगारांतून ३ तारखेला तब्बल ५२५ जादा बसेस सोडण्याची तयारी एसटीने केली आहे. शिवाय ४ सप्टेंबर रोजी देखील
जिल्हयातील सर्व आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार तसेच संख्या लक्षात घेवून देखील जादा बसेस सोडण्यात येतील.
दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड, एसटी
१०० ते १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी अन्य जिल्हयातून बसेसची तजवीज करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार व गरजेनुसार जादा गाड्या सोडण्याची तयारीदेखील एसटीच्या रायगड विभागाने केली आहे. महाड, श्रीवर्धन, माणगाव आणि रोहा या चार आगारांमधून सुटणाऱ्या गाडयांची संख्या मोठी आहे. त्यासाठी आगावू आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली असून अनेकांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच आरक्षण करून ठेवले आहे. परतीच्या प्रवासात चाकरमान्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी एसटीच्या रायगड विभागाने घेतली आहे.