

अलिबाग : श्रावण महिन्यात फळांना जसे महत्व असते तसे ड्रायफ्रुट ना देखील असते. त्यामध्ये ओला खजूर जास्त महत्व असते. हे केवळ फळ नसून एकप्रकारे व्हिटॅमिनची कॅप्सूलच आहे. ओल्या खजुरातून लहान-मोठ्यांना पोषणतत्त्वांचा खजिनाच उपलब्ध होतो. सध्या बाजारात ओल्या खजुराची मोठी आवक वाढली आहे. नैसर्गिक गोडवा असलेल्या ओल्या खजुरामुळे मेंदूचे कार्यदेखील सुधारते. एकूणच ओले खजूर हे आरोग्यदायी फळ आहे.
पावसाळ्यात ओल्या खजुराची बाजारात आवक होते. सध्या शहरात आले खजूर विक्रीस आले आहे. 100 ते 120 रुपये किलो दराने त्याची विक्री केली जात आहे. ओल्या खजुराचे अनेक फायदे आहेत. ते ऊर्जा वाढवतात, पचन सुधारतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात. ओले खजूर नैसर्गिक साखरेने (नैसर्गिक फॅक्टोज आणि ग्लुकोज) समृद्ध असतात. ज्यामुळे ते एक उत्कृष्ट ऊर्जास्रोत ठरतात. खजुरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
खजुरामध्ये लोह भरपूर असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अॅनिमियाचा त्रास कमी होतो. खजुरामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
खजुरामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतो, जो हाडांसाठी आवश्यक असतो. खजूर खाल्ल्याने हाडे अधिक मजबूत होतात. शिवाय खजूर मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे पुरवतात. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. ओले खजूर नैसर्गिकरीत्या गोड असल्याने, ते साखर किंवा इतर गोड पदार्थांसाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.
ओले खजूर सध्या विक्रीस आले आहे. त्याची किंमत 100 ते 120 रुपये प्रतिकिलो एवढी आहे. खजूर आरोग्यदायी फळ असल्याने त्याला मोठी मागणी आहे. ग्राहकांकडून सध्या ओले खजूर खरेदी केले जात आहेत. ओले खजूर लाल आणि पिवळ्या अशा दोन रंगांचे असतात. शहरात लाल खजूर विक्रीस अधिक प्रमाणात दिसून येतात.
ओल्या खजुरापासून तुम्ही विविध प्रकारचे स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवता येऊ शकते. यात खजूर रोल, खजूर बर्फी, खजूर-नारळ लाडू किंवा खजूर-शेंगदाणा लाडू, आदी पदार्थाचा समावेश आहे. तसेच खजुराचा वापर गोड पदार्थांमध्ये, ज्यूसमध्ये किंवा स्मुदीमध्येही केला जातो. ओले खजूर खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरीत्या ऊर्जा मिळते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही. ओल्या खजुरामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. तसेच पचनक्रिया सुधारते. ओल्या खजुराचे फायदे घेण्यासाठी ते आहारात नियमितपणे समाविष्ट करणे चांगले आहे.