

पनवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण उद्या येणार आहे. पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल २१ एप्रिल रोजी जाहीर होणार असून, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांवर काय शिक्षा सुनावली जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
२०१६ साली घडलेला हा हत्याकांड अनेक महिन्यांपर्यंत गूढ होता. मिरा रोड परिसरात अश्विनी बिंद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. आरोपी अभय कुरुंदकर याच्यावर बिंद्रे यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याचा आरोप होता. हत्या केल्यानंतर मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही या प्रकरणात आहे.
या खटल्यात सुमारे ८५ साक्षीदार तपासण्यात आले असून, अनेक पुरावे आणि तांत्रिक तपशील कोर्टासमोर मांडण्यात आले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद केला, तर आरोपींच्या वतीने वकील विशाल भानुशाली यांनी बचाव युक्तिवाद सादर केला.
उद्या या खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे. न्यायालय अभय कुरुंदकर व इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावते की जन्मठेपेची याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बिंद्रे कुटुंबियांसह राज्यातील पोलीस दल, महिला संघटना आणि नागरिकांच्या नजरा उद्याच्या निकालावर खिळल्या आहेत.
हा खटला केवळ एका अधिकाऱ्याच्या हत्येपुरता मर्यादित नसून, कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील गतिशीलता यांचा तो कसोटी क्षण मानला जात आहे.