

पनवेल : शंभर रुपयांच्या पाच बनावट नोटा वितरित करून फसवणूक केल्याप्रकरणी नामदेव महादेव नगराळे (राहणार शांतीवन सोसायटी, सेक्टर १५ नवीन पनवेल) यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जीवराज भाटी हे नवीन पनवेल येथे किराणा मालाचे दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात एक इसम आला. त्याने शंभर रुपयाच्या तीन नोटा दिल्या त्यावेळी २६५ रुपयाचा माल खरेदी केल्यानंतर ३५ रुपये परत दिले. यावेळी शंभर रुपयांच्या नोटा बनावट असल्याचा संशय आला.
त्यानंतर २८ जानेवारी रोजी पुन्हा तो इसम दुकानात आला आणि त्याने तीन किलो पीठ खरेदी केले. यावेळी शंभर रुपयांच्या दोन नोटा दिल्या त्या नोटा देखील बनावट दिसून आल्या. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर नामदेव नगराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानदाराच्या तत्परतेमुळे बनावट नोटांच्या गुन्ह्याला आळा बसला आहे.