

माणगांव : माणगाव तालुक्यात शेती पद्धतीत गेल्या काही वर्षांत मोठा बदल दिसून येत आहे. पारंपरिक भातशेतीपेक्षा अधिक उत्पादन आणि चांगला दर मिळतो म्हणून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात कडधान्ये, भाजीपाला आणि कलिंगडासारख्या नगदी पिकांकडे वळताना दिसतात. उन्हाळ्यातील रब्बी हंगामात कालव्याच्या पाण्यावरील भातशेतीलाही शेतकरी पर्याय म्हणून पाहत होते. यावर्षीची हवामानातील अनिश्चितता संपूर्ण हंगामाचे गणित विस्कटून टाकत आहे.
हवामान बदलाचे वाढते सावट
रायगड जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान पाऊस कोसळतो आणि ऑक्टोबर महिन्यात शेतीचा नवा हंगाम सुरू होतो - हे अनेक वर्षांपासूनचे चक्र आहे. यंदा मात्र ऑक्टोबर संपत आला तरी पावसाने उघडीप दिलेली नाही. सततच्या पावसाने भातशेतीची कापणी रखडली आहेच, शिवाय हिवाळी पिकांच्या बोजड हंगामालाही तडा गेला आहे.कडधान्यांची पेरणी अडचणीत
ऑक्टोबरमध्ये कडधान्यांच्या पेरणीसाठी योग्य ओलावा असतो. भात कापणीनंतर शेतकरी वाल, पावटा, मटकी, मुग, तूर यांसारख्या कडधान्यांचे बियाणे पेरण्याची प्रथा आहे. यंदा देखील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस ओसरल्याच्या अपेक्षेने पेरणी केली होती; परंतु सततच्या सरींनी या बियांणाचे कुजून नुकसान झाले. पेरणीची वेळ हातून निघून गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कडधान्याचे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पेरणी केल्यास हवामान थंड होत जात असल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी उत्पादन आणि गुणवत्ता या दोन्हीवर परिणाम होतो, आणि नगदी पीक असल्याने आर्थिक नुकसानही अधिकच वाढते.
भातशेतीचे नुकसान, आता हिवाळी पिकांनाही संकट -
भात जमिनीत चिखलात रुतला, काही ठिकाणी पाण्यात बुडाला. अशात हिवाळी पिकांच्या उशीरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दुहेरी आघात झाला आहे. काही शेतांचे पाणी उतरण्याचे नाव घेत नाही, तर ओलाच्या अतिरेकामुळे पेरणीसाठी जमीन तयार करणे शक्य होत नाही.
शेतकरी चिंतेत, हंगामाचे भवितव्य धोक्यात
हिवाळी पिके यशस्वी होण्यासाठी स्वच्छ आभाळ, सौम्य थंडी आणि मध्यम ओलावा आवश्यक असतो. मात्र यंदाच्या हवामानाने या तिन्ही गोष्टींना तडा गेला आहे. शेतकऱ्यांसमोरही कठीण प्रश्न उभा राहिला आहे. कधी पेरणी करावी, पेरणी उशिरा केली तर वाढ कशी होईल, उत्पादन कमी झाल्यास आर्थिक तोटा किती मोठा असेल, या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ताणावा खाली आहेत.