

रायगड : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जुलै २०२५ ची प्राथमिक वेतनपट आकडेवारी नुकतीच जारी केली आहे, या महिन्यात संघटनेच्या सदस्यांची संख्या २१.०४ लाखांनी वाढल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीच्या वर्ष-दर-वर्ष विश्लेषणानुसार,वेतनपटावरील कर्मचारी संख्या जलै २०२४ तुलनेत ५.५५ टक्क्याने वाढल्याचे दिसून आले असून, ही वाढ नोकरीच्या वाढत्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलच्या वाढत्या सजगतेचे द्योतक असून ईपीएफओच्या प्रभावी आउटरीच उपक्रमांचीही त्याला मदत झाली आहे. वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात २०.४७ टक्के योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे.
कर्मचारी लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता जुलै २०२५ या एका महिन्यामध्ये ईपीएफओकडे सुमारे ९.७९ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. नवीन सदस्यांच्या संख्येतील या वाढीस नोकरीच्या वाढत्या संधी,कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओच्या आउटरीच कार्यक्रमांचे यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
५.९८ लाख नवीन सदस्य १८ ते २५ वयोगटातील सदस्यांचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले आहे. ईपीएफओकडे १८ ते २५ वयोगटातील ५.९८ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी झाली असून जुलै २०२५ मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये त्यांचे प्रमाण ६१.०६ टक्के आहे. याशिवाय, जुलै २०२५ मध्ये वेतनपटात समाविष्ट झालेल्या १८ ते २५ वयोगटातील सदस्यांची निव्वळ संख्या ९.१३ लाख असून ती मागील वर्षाच्या म्हणजे जुलै २०२४ च्या तुलनेत ४.०९ टक्क्याने वाढल्याचे आढळते. बहुतांश व्यक्ती तरुण असल्याचे आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणारे असल्याचे यातून सूचित होत आहे.
१६.४३ लाख सदस्यांची पुन्हा नोंदणी
यापूर्वी बाहेर पडलेले सुमारे १६.४३ लाख सदस्यांनी जुलै २०२५ मध्ये पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. ही संख्या जुलै २०२४ च्या तुलनेत १२.१२. टक्क्याने वाढल्याचे दिसते. हे सदस्य नोकऱ्या बदलून ईपीएफओच्या कार्यकक्षेत समाविष्ट असलेल्या उपक्रमांमध्ये पुन्हा सामील झाले असून त्यांच्या नावे जमा झालेली रक्कम मिळण्यासाठी अर्ज करून खाते बंद करण्याऐवजी आपल्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार करून ती पुढे हस्तांतरित करण्याच्या पर्यायाची निवड केली आहे.
महिला सदस्यांच्या संख्येत वाढ
जुलै २०२५ मध्ये सुमारे २.८० लाख नवीन महिला सदस्यांनी ईपीएफओच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली. जुलै २०२४ च्या तुलनेत वर्षभरात ०.१७ टक्के वाढीसह महिन्याभरात वेतनपटावरील महिला सदस्यांची संख्या ४.४२ लाख झाली. नवीन सामील झालेल्या महिला सदस्यांच्या संख्येतील वाढीतून कार्यबलात अधिकाधिक समावेशकता आणि वैविध्यपूर्ण येत असल्याचे सूचित होते.
राज्यनिहाय योगदानात महाराष्ट्राची आघाडी
वेतनपट आकडेवारीचे विश्लेषण केले असता प्रमुख पाच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा एकंदर वेतनपटात सुमारे ६०.८५ टक्के वाटा असल्याचे आढळले असून या राज्यांमधून महिन्याभरात सुमारे १२.८० लाख सदस्यांची भर पडली आहे. या राज्यांमध्ये, वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात २०.४७ टक्के योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिन्याभरात वेतनपटात ५ टक्क्याहून अधिक नवीन सदस्यांची भर पडली आहे.
विविध उद्योग क्षेत्रात नवे सदस्य
उद्योग-निहाय आकडेवारीची महिना-दर-महिना तुलना करता वेतनपटावरील सदस्य संख्येतील वाढीत उद्योग क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लोह खनिज खाणी, विद्यापीठ, विडी उद्योग, तयार कपड्यांची निर्मिती, रुग्णालये, व्यावसायिक संस्था, ट्रॅव्हल एजन्सीज, दगडाच्या खाणी या क्षेत्रांचा समावेश आहे.
कर्मचारी नोंदींचे अखंड अद्ययावतीकरण
कर्मचाऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे, हे अखंडपणे चालणारे काम असल्याने डेटा तयार करणे, ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असते, या अद्ययावतीकरणामध्ये वेतन अहवाल तयार केल्यानंतर मागील महिन्यांचे ईसीआर दाखल केले जातात., वेतन अहवाल तयार केल्यानंतर पूर्वी दाखल झालेल्या ईसीआरमध्ये सुधारणा करण्यात येतात., मागील महिन्यांची बाहेर पडण्याची तारीख पेरोल अहवाल तयार केल्यानंतर नोंदविली जाते.