

रायगड : जयंत धुळप
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जुलै 2025 ची प्राथमिक वेतनपट आकडेवारी जाहीर केली असून, केवळ एका महिन्यात 21.04 लाख नवीन सदस्यांची भर पडली आहे. जुलै 2024च्या तुलनेत ही वाढ 5.55% असून, रोजगार संधी व कर्मचारी लाभांविषयीची जागरूकता याचे हे द्योतक मानले जात आहे. या वाढीत 20.47% योगदान देत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
जुलै 2025 या एका महिन्यामध्ये ईपीएफओकडे सुमारे 9.79 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. नवीन सदस्यांच्या संख्येतील या वाढीस नोकरीच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओच्या आउटरीच कार्यक्रमांचे यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले आहे. ईपीएफओकडे 18 ते 25 वयोगटातील 5.98 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी झाली असून जुलै 2025 मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये त्यांचे प्रमाण 61.06 टक्के आहे.
विविध उद्योग क्षेत्रांत नवे सदस्य
उद्योग-निहाय आकडेवारीची महिना-दर-महिना तुलना करता वेतनपटावरील सदस्य संख्येतील वाढीत उद्योग क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लोह खनिज खाणी, विद्यापीठ, विडी उद्योग, तयार कपड्यांची निर्मिती, रुग्णालये, व्यावसायिक संस्था, ट्रॅव्हल एजन्सीज, दगडाच्या खाणी या क्षेत्रांचा समावेश आहे.
नवीन सदस्य ‘या’ क्षेत्रांतून
लोह खनिज खाणी
विद्यापीठे
विडी उद्योग
तयार कपड्यांचे उत्पादन
रुग्णालये
व्यावसायिक संस्था
ट्रॅव्हल एजन्सीज
दगड खाणी
महत्त्वाचे मुद्दे
एकूण नवीन सदस्य वाढ : 21.04 लाख
महाराष्ट्राचे योगदान : 20.47% (देशात पहिला)
नवीन नोंदणीकृत सदस्य : 9.79 लाख
18 ते 25 वयोगटातील तरुण : 5.98 लाख (61.06%)
जुने सदस्य परत सामील : 16.43 लाख (+12.12%)
नवीन महिला सदस्य : 2.80 लाख
टॉप राज्यांचा वाटा : 60.85% (महाराष्ट्र अग्रस्थानी)