

खालापूर ः पावसाळी पर्यटन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी झेनिथ धबधबा येथे येण्यास बंदी असताना देखील मुंबईतून आलेले अति उत्साही अकरा पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून बसले. परंतु सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्याने सर्वांची सुखरूप सुटका झाली.
आठवडाभर काहीसा शांत असलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील कुर्ला, भांडुप येथील अकरा तरुण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सोमवारी सकाळी खोपोलीत आले होते. बंदी असलेल्या झेनित धबधब्यावर जाण्यासाठी आडवाटेने हे पर्यटक धबधब्यावर पोहचले होते. सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंगर माथ्यावरून वाहत येणार्या पाण्याचा प्रवाहामुळे धबधब्यापर्यंत जाणारी वाट पाण्याच्या लोंढ्यामध्ये दिसेनाशी झाल्यावर पर्यटकांची घाबरगुंडी उडाली.
स्थानिक आणि याबाबतची माहिती तातडीने अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरुनाथ साठेलकर यांना दिली. तातडीने अपघातग्रस्त मदत पथकाचे विजय भोसले, अमोल कदम, महेश भोसले, संजय म्हात्रे सर्व संसाधनासह धबधब्यावर पोहचले. धबधब्यावर अडकून बसलेल्या रोहन मल्ला वय 19, नितीन यादव 17, देवेन सावंत 20, साहिल गुप्ता 19, शाम यादव 19, पियुष कुशवाहा 19, विवेक कनोजिया 19, अनुज यादव 19, शैलेश प्रजापती 17 सर्व भांडुप, श्रवण पाल 22 कुर्ला, दिपेश पांडे 19 कुर्ला यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.