Earth Day 2025 | '२०५० पर्यंत १५ कोटी लोक हवामान बदलामुळे स्थलांतरित होतील'

जागतिक वसुंधरा दिन : "जगण्याचा श्वास – वसुंधरेचा आवाज"
Earth Day 2025
जागतिक वसुंधरा दिन (file photo)
Published on
Updated on
प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला
पर्यावरण व भूगोल विभाग प्रमुख सुंदरराव मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलादपूर रायगड

आज २२ एप्रिल २०२५ रोजी साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनाची (Earth Day 2025) जागतिक स्तरावरील संकल्पना आहे. "Our Power, Our Planet" (आपली ऊर्जा, आपला ग्रह).​ ही संकल्पना नूतनीकरणीय ऊर्जा (renewable energy) आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. जगभरातील लोकांना २०३० पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मिती तीनपट वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सौर, पवन, जलविद्युत, भू-तापीय आणि ज्वारीय ऊर्जा स्रोतांचा समावेश आहे. या वर्षीचा वसुंधरा दिन ५५ वा वर्धापन दिन आहे आणि १९२ देशांतील १ अब्जांहून अधिक लोक या उपक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या संकल्पनेचा उद्देश असा आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन नूतनीकरणीय ऊर्जा स्वीकारावी, पर्यावरणाचे रक्षण करावे, त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ म्हणजे काय आहे ? जागतिक तापमनवाढीचा निसर्गावर कसा परिणाम होत आहे? जागतिक तापमानवाढीमुळे सागरांच्या पाण्याची पातळी कशी वाढेल? मानवी जीवनावर जागतिक तापमनवाढीचा काय परिणाम होईल? हे समजावून घेवून तश्या प्रकारे कृती करुन एक आरोग्यदायी, शाश्वत आणि समृद्ध भविष्य आपण घडविण्याचा प्रयज्ञ करुया…

जागतिक तापमानवाढ म्हणजे काय?

आपल्या पर्यावरणात झपाट्याने बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत सृष्टीमध्ये दिसून येत आहेत. ऋतुचक्रामध्ये बिघाड झाल्यामुळे वसंत ऋतू लवकर येतो आहे आणि शरद ऋतू उशिरा येतो आहे. हिवाळ्यातील थंडीची तीव्रता कमी होत आहे, तर दुष्काळ अधिक काळ टिकत आहेत. झाडांना फुले असमयी येत आहेत आणि जंगलांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अंटार्क्टिकामधील हिमकडे कोसळत आहेत, पर्वतीय भागांतील हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत, समुद्र जमिनीवर चढून येत आहे आणि अनेक जलजीव व स्थलजीव नामशेष होत आहेत.

Pudhari

या सर्व बदलांना कारणीभूत असलेली प्रमुख गोष्ट म्हणजे जागतिक तापमानवाढ. वरील घटनांमुळे तापमानवाढीचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. या वाढीला मुख्यत्वे मानव जबाबदार आहे. माणसाने औद्योगिकीकरणाच्या नावाखाली उभारलेल्या कारखान्यांमधून, वाहनांमधून, थर्मल पॉवर प्लांट्समधून आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमधून प्रचंड प्रमाणात हरितगृह वायू हवेत मिसळले जात आहेत. क्लोरोफ्लुरो-कार्बन्ससारखे द्रव्य स्प्रे आणि रेफ्रिजरेटर्समध्ये वापरले जातात. हे सगळे कार्बन डायऑक्साइड, मेथेन, नायट्रस ऑक्साइड आणि हॅलोकार्बन्ससारखे वायू वातावरणातील उष्णता अडकवतात आणि तापमान वाढीस कारणीभूत ठरतात. १९०० साली जगभर फक्त १ अब्ज टन कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळत होते, ते १९९५ साली ७ अब्ज टनांवर गेले. १८५० साली पृथ्वीचे सरासरी तापमान १४.५ अंश सेल्सिअस होते, जे २००० साली १५.३ अंश सेल्सिअस झाले. फक्त विसाव्या शतकातच तापमानात ०.६ अंश सेल्सिअस वाढ झाली. तथापि, हे फक्त सरासरी तापमान आहे. काही भागांमध्ये त्यापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. २००५ साली भारतातील काही भागांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, ज्यामुळे अनेक लोक ऊष्माघाताने मृत्युमुखी पडले. वर्तवले गेलेले अंदाज सूचित करतात की, पुढील १०० वर्षांत पृथ्वीचे तापमान १.४ ते ५.८ अंश सेल्सिअसने वाढू शकते. याचा परिणाम म्हणजे भारतात मे महिन्यात तापमान ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा अतितप्त हवामानात अनेक जीवसृष्टी संकटात सापडेल.

१९९० ते २००० या दहा वर्षांच्या कालावधीत हरितगृह वायूंमध्ये झालेली वाढ पाहता, सर्वात जास्त वाढ कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात दिसून येते. १९९० मध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ४.९६९४ मेट्रिक टन होते, जे १९९५ मध्ये ५.२७३५ वर गेले आणि २००० पर्यंत ५.८०६१ मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले. यामधून स्पष्ट होते की औद्योगिकीकरण, वाहनांची वाढ, आणि जंगलतोड यामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सतत वाढले आहे. दुसरीकडे, मीथेनच्या प्रमाणात थोडीशी घट झाली आहे. १९९० मध्ये ३.१७ कोटी मेट्रिक टन असलेले मीथेन १९९५ मध्ये ३.११ कोटींवर गेले आणि २००० मध्ये २.८२ कोटी मेट्रिक टनांवर आले. ही घट शेतीत वापरले जाणारे तंत्रज्ञान, जनावरांच्या व्यवस्थापनात बदल किंवा सेंद्रीय कचऱ्याच्या नियंत्रणामुळे झाली असावी. नायट्रस ऑक्साईडच्या बाबतीत १९९० मध्ये त्याचे प्रमाण १२ लाख मेट्रिक टन होते, जे १९९५ मध्ये वाढून १३ लाखांवर गेले, परंतु २००० मध्ये पुन्हा १२ लाखांवर आले. खतांचा वापर, औद्योगिक प्रक्रिया आणि ज्वलनप्रक्रिया यामुळे या वायूचे प्रमाण वाढते. एकंदरीत पाहता, या दहा वर्षांत कार्बन डायऑक्साइड हे प्रमुख हरितगृह वायू म्हणून सर्वाधिक प्रमाणात वाढले असून, इतर वायूंमध्ये काही प्रमाणात घट किंवा स्थैर्य दिसून येते.

जागतिक तापमनवाढीचा निसर्गावर कसा परिणाम होत आहे?

जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण निसर्गव्यवस्थेवर होणार हे स्पष्ट आहे. स्थानिक हवामानात लक्षणीय बदल दिसून येतील. उदा. बर्फाने आच्छादित असलेली भूमी वनस्पतींनी झाकलेली आढळेल, पावसाचे प्रमाण वाढेल, तर काही भागांमध्ये भीषण दुष्काळ पडेल. परिसंस्था ढासळतील, सागरी पाण्याच्या गुणधर्मांत बदल होईल, ज्यामुळे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येईल. हवामानातील टोकाचे बदल जमिनीच्या वाळवंटीकरणास कारणीभूत ठरतील. हे सर्व बदल समजून घेणे आवश्यक आहे.

सागरी पाण्याचे आम्लीकरण ही एक गंभीर समस्या बनत आहे. महासागर कार्बन-डाय-ऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. हा CO₂ पाण्यात विरघळून वीक कार्बोनिक अ‍ॅसिड तयार करतो, ज्यामुळे सागराच्या पाण्याचा पी एच कमी होतो. औद्योगिक क्रांतीनंतर पीएचमध्ये ०.१ ने घट झाली असून, २१०० पर्यंत ती ०.५ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम प्रवाळ, शिंपलेधारी जलचर आणि त्यांच्या अन्नसाखळीतील प्लॅक्टनवर होईल. माशांच्या वाढीवरही त्याचा परिणाम होईल. अत्यधिक हवामान बदल देखील अधिक दिसून येतील. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वाढून काही भागांत धुवांधार पाऊस तर काही ठिकाणी तीव्र दुष्काळ जाणवेल. अवेळी पावसाळा, गडगडाटासह वादळे आणि प्रचंड वेगाने येणारी चक्रीवादळे यांचे प्रमाण वाढेल. १९७० ते १९९० या काळात चक्रीवादळांत १५% वाढ झालेली दिसून आली आहे.

स्थानिक हवामानातील अस्थिरता आर्क्टिक भागांमध्ये अधिक ठळकपणे दिसते. गेल्या ५० वर्षांत तेथील तापमान १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. बर्फ वितळल्याने जमिनीतील जिवाणू अधिक सक्रिय होत असून, जमिनीतील कार्बन डाएऑक्साइड शोषण्याऐवजी त्याचे उत्सर्जन होत आहे. त्याचबरोबर मिथेन वायूही वातावरणात सोडला जात आहे. हिमनद्यांचे क्षेत्र कमी होत आहे.- गेल्या १०० वर्षांत हे क्षेत्र ५०% नी घटले आहे. किलीमांजारो पर्वताचे शिखरही २००५ साली पूर्णपणे उघडे पडले. हिमनद्यांच्या वितळण्यामुळे तलाव भरून वाहू लागतात आणि नद्यांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता वाढते.

ओझोन स्तरातील घट ही आणखी एक चिंता आहे. स्थितांबरातील ढगांची वाढ आणि हॅलोकार्बन्समुळे ओझोन नष्ट होण्याचा वेग वाढतो. ओझोन स्तर सजीवांना अतिनील किरणांपासून वाचवतो, त्यामुळे या घटनेचे गंभीर परिणाम दिसून येतात — श्वसन विकार, रोग, मृत्यूदर वाढ आणि उत्पादनात घट. परिसंस्थांचा ऱ्हासदेखील एक मुख्य परिणाम आहे. हवामान बदलामुळे फुलपाखर्यांच्या जाती स्थलांतर करत आहेत. ऋतूचक्र बदलल्याने फुलांचा बहर, पक्ष्यांचे अंडी देण्याचे कालावधी आणि हिवाळ्यात झोपेत गेलेल्या प्राण्यांची जागृती वेळेआधी होत आहे. अनेक प्रजाती उत्तरेकडे वा पर्वतीय उंच भागात स्थलांतर करत आहेत. ध्रुवीय भागांतील प्राणी संकटात आले आहेत. बर्फ वितळल्याने अस्वलांचे निवासस्थान उघडे पडते आणि सील प्राण्यांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम होतो. कॅरेबू सारख्या प्रजातींची संख्याही लक्षणीय घटली आहे. यामुळे अनेक पशु-पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

जागतिक तापमानवाढीचा सगळ्यात मोठा परिणाम सागरी पाण्याच्या पातळीवर

जागतिक तापमानवाढीचा सगळ्यात मोठा परिणाम सागरी पाण्याच्या पातळीवर होणार आहे. पृथ्वीच्या ७० टक्के भागावर पाणी आणि उरलेल्या ३० टक्क्यांवर जमीन असल्यामुळे, हवामानातील बदलांचा सगळ्यात मोठा परिणाम सागरांवर होईल, हे अपेक्षितच आहे. समुद्राच्या पातळीतील वाढ मुख्यतः दोन कारणांमुळे होते. उष्णतेमुळे पाण्याचा प्रसरण होणे आणि हिमनद्यांचे वितळणे. - तापमान वाढल्याने पाण्याचे घनफळ वाढते. उष्ण कटिबंधातील समुद्राच्या १०० मीटर खोल पाण्याचे तापमान जेंव्हा १ अंश सेल्सिअसने वाढते, तेंव्हा ऊष्मीय प्रसरणामुळे पाण्याची पातळी सुमारे ३ सेंटीमीटरने वाढते. याशिवाय, जागतिक तापमानवाढीमुळे हिमालय, अंटार्क्टिका आणि इतर पर्वतरांगांमधील बर्फ वितळतो. हिमालयातील गंगोत्री हिमनदी दरवर्षी सुमारे ३० मीटरने मागे सरकत आहे, आणि हीच गती राहिली तर २०३५ पर्यंत अनेक हिमनद्या नामशेष होतील. आल्प्स, अँडिज आणि रॉकी पर्वतरांगांमध्येही हीच स्थिती निर्माण होईल. गेल्या शंभर वर्षांत हिमनद्या वितळल्यामुळे समुद्रपातळीत २ ते ५ सेंटीमीटर वाढ झाली आहे.

अंटार्क्टिका खंडावरील बर्फही तापमानवाढीमुळे वेगाने तुटून समुद्रात पडतो. उदाहरणार्थ, २००२ मध्ये ८५०६४ चौरस किलोमीटरचा बर्फखंड अंटार्क्टिकामधून वेगळा झाला होता. अंटार्क्टिकावरील बर्फाची जाडी २.५ ते ४ किलोमीटरच्या दरम्यान असते. शंभर वर्षांपासून समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे १ ते २.५ मिलीमीटरने वाढत आहे. परिणामी, एकूण वाढ १० ते १५ सेंटीमीटर झाली आहे. भविष्यातील अंदाजानुसार, २०३० मध्ये ही वाढ सुमारे १५ सेंटीमीटर, २०५० मध्ये २५ सेंटीमीटर आणि २१०० मध्ये ५० सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते. समुद्राच्या पातळीतील या वाढीचा गंभीर परिणाम समुद्रकिनाऱ्यावरील देशांवर आणि बेटांवर होणार आहे. पॅसिफिक महासागरात हवाई आणि ऑस्ट्रेलियामधील तुवालू नावाच्या बेटसमूहात सुमारे १२००० लोकवस्ती आहे. ही बेटे समुद्राच्या अगदी पातळीवर असल्यामुळे भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील लोकांनी न्यूझीलंडमध्ये स्थलांतराची मागणी केली आहे.

भारताच्या नैऋत्येस असलेल्या मालदीव बेटांना देखील या वाढीचा धोका आहे. मालदीवची लोकसंख्या सुमारे ३.१५ लाख असून, राजधानी मालेभोवती समुद्रात संरक्षणासाठी भिंत बांधण्यात आलेली आहे. मात्र, जर समुद्राची पातळी १ मीटरने वाढली, तर सर्व बेटं जलमय होतील. या वाढीचा सर्वाधिक फटका बांगलादेशला बसण्याची शक्यता आहे. १.३४ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या देशात सुमारे १२ कोटी लोक राहतात. जर समुद्रपातळी १ मीटरने वाढली, तर सुमारे १६ टक्के जमीन पाण्याखाली जाईल आणि १.५ कोटी लोक बेघर होतील. अशा प्रकारची स्थिती जगभरातील अनेक सागरी किनाऱ्यावरील शहरांनाही भोगावी लागणार आहे. सागरी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचे अंदाज दोन पद्धतींनी वर्तवले गेले आहेत. एक म्हणजे आदर्श (न्यूनतम) अंदाज, ज्यामध्ये जागतिक तापमानवाढ नियंत्रणात राहिल्याचे गृहीत धरले आहे, आणि दुसरा उच्चतम अंदाज, ज्यामध्ये तापमानवाढीवर नियंत्रण मिळवले गेले नाही असे गृहित धरले आहे.

उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये सागरी पातळी आदर्श अंदाजानुसार ३.८ सें.मी.ने वाढली होती, तर उच्चतम अंदाजानुसार ही वाढ १३.३ सें.मी. इतकी होती. पुढे २०४० मध्ये आदर्श वाढ ५.७ सें.मी. तर उच्चतम वाढ २६.७ सें.मी. होती. २०६० पर्यंत ही वाढ अनुक्रमे ७.६ आणि ४२.० सें.मी. झाली. २०८० मध्ये ही वाढ ११.५ (आदर्श) व ६१.० (उच्चतम) सें.मी.पर्यंत गेली. आणि अखेरीस, २१०० पर्यंत सागरी पातळी आदर्श गृहित धरून १३.३ सें.मी. वाढेल, तर प्रतिकूल परिस्थितीत ती ९२.० सें.मी. पर्यंत वाढू शकते. या तुलनेतून स्पष्ट होते की जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर सागरी पातळीत लक्षणीय आणि धोका निर्माण करणारी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे किनारी भागांवरील शहरे, शेती, आणि जैवविविधता मोठ्या संकटात येऊ शकतात.

मानवी जीवनावर जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम?

मानवाने विविध औद्योगिक उपक्रमांचा आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण केलेला पर्यावरणीय तणाव जागतिक तापमानवाढीला जबाबदार धरला जातो. ही वाढ मानवनिर्मित असून तिला ‘अ‍ॅन्थ्रपोजेनिक’ स्वरूप आहे. मात्र, या संकटाचे परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर थेट परिणाम होईल. तापमानवाढीमुळे शेती संकटात येईल, अन्नधान्याचा तुटवडा भासेल, शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय धोक्यात येतील. पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊन, भविष्यात देशांमध्ये केवळ पाण्यावरूनही युद्धे भडकण्याची शक्यता निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर जागतिक तापमानवाढ मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर कसा परिणाम घडवून आणेल, हे पाहणे गरजेचे आहे.

वाढते तापमान दीर्घकालीन दुष्काळ निर्माण करू शकते. पाण्याअभावी शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल. जमिनीच्या पृष्ठभागाजवळ विषारी ओझोन वायूचे प्रमाण वाढेल. भारत आणि आफ्रिका खंडातील पावसावर अवलंबून असलेली शेती यामुळे गंभीरपणे प्रभावित होईल. यामुळे शेतीसह संबंधित उद्योगधंदे कोलमडतील. तसेच, शेतीशी निगडित असलेल्या प्राणीधनातील गाय, म्हैस, बैल यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होईल. समुद्राची वाढती पातळी अनेक बेटांचे अस्तित्व संपवेल. या भागांतील लोकांना सुरक्षिततेसाठी इतर देशांत स्थलांतर करावे लागेल. अंदाजानुसार २०५० पर्यंत सुमारे १५ कोटी लोक हवामान बदलामुळे स्थलांतरित होतील. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागांतीलही अनेक लोकांना आपली भूमी सोडावी लागेल. त्याचवेळी, जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

तापमानवाढीचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. उन्हाळ्यात ऊष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. २००३ साली युरोपात अशा कारणाने २२ ते ३५ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. भारतातही दरवर्षी अशा मृत्यूंची नोंद होते. संशोधनानुसार, तापमानातील एका अंशाची वाढ माणसाचे वर्तन अधिक आक्रमक करते. अमेरिकेत एका अंशाच्या वाढीने २४,००० खून अधिक होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो. तापमानवाढ संसर्गजन्य रोगांचे क्षेत्रफळ वाढवते. विशेषतः मलेरियासारखे रोग नव्या भागांत पसरू शकतात. विकसनशील देशांमध्ये याचा प्रभाव अधिक तीव्र जाणवेल. जर ओझोन स्तर कमी झाला, तर त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू यांसारख्या रोगांचे प्रमाण वाढेल. जमिनीवरच्या पातळीवर निर्माण होणारे प्रदूषण दम्यासारख्या श्वसन विकारांना चालना देईल. जागतिक तापमानवाढीमुळे हवामान बदल, हिमनद्यांचे वितळणे, समुद्रपातळी वाढ, आणि परिसंस्थेचा ऱ्हास हे गंभीर परिणाम आपणांस जाणवू लागले आहेत. सागरी पातळीतील वाढ किनारपट्टीवरील देशांना व बेटांना धोका निर्माण होत आहे. मानवाने केलेली स्थलांतरे मानवी संकटे वाढवत आहे. तापमानवाढ शेती, आरोग्य, जलस्रोत, आणि मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम घडवते, त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. आणि हे सर्व आपल्या हातात आहे.

संदर्भ ग्रंथ

⦁ Environment: Problems and Solutions – D.K. Asthana & Meera Asthana

⦁ Climate Change: The Facts – Dr. Jennifer Marohasy (Editor)

⦁ Our Planet – David Attenborough

⦁ The Sixth Extinction – Elizabeth Kolbert

⦁ This Changes Everything: Capitalism vs. The Climate – Naomi Klein

⦁ Earth in the Balance – Al Gore

⦁ Global Warming: Understanding the Forecast – David Archer

⦁ Introduction to Environmental Science – Y. Anjaneyulu

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news