पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा
तंत्रज्ञानाचे युग असल्याने अनेक ग्रामीण टच असलेल्या पारंपरिक वस्तु कालबाह्य झाल्या असल्या तरी सणासुदीचे काळात त्या वस्तुंना विशेष मागणी असल्याने अनेक व्यवसायिक सणासुदीला त्या वस्तू बनविण्यास प्राधान्य देत आहेत. शहर प्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा बांबूच्या सुपाची जागा प्लास्टिक किंवा अल्युमिनियमच्या सुपाणी घेतली. आज तर पाटा वरवंटाची जागा इलेक्ट्रिक मिक्सर ने घेतली आहे.
या वर्षी गौरीच्या ओवशासाठी सुपांना मोठया प्रमाणात मागणी असल्याने 16 बंदी सुपेसह इतर सुपे मोठ्या प्रमाणात गावगावातील व्यावसायिकांकडे विक्रीला आली होती. त्यापैकी अनेक सूप व्यावसायिक हे घाटमाथ्यावरील भोर- वाई या भागातून पोलादपूर-महाडमध्ये विक्रीसाठी आले होते. महाड व पोलादपूरसारख्या गावात पारंपरिक व्यवसाय जपणे गरजेचे आहे.
पूर्वी महात्मा गांधींच्या आदर्श ग्राम कल्पनेतील स्वयंपूर्ण अशी गावे होती. गावात कुंभार, चर्मकार, लोहार, नाभीक, पाथरवट सोनार, बुरुड, सुतार यासह बारा बलूतेदारांच्या हाताला काम होते. गावाची एक स्वायत्त ग्रामसंस्कृती होती पण हळूहळू शहरी भागात औद्योगिककरणाचे वारे वाहू लागले आणि त्याचे लोण ग्रामीण भागात पोहचले. परिणामी शेतकर्याच्या खिशात पैसा खुळखुळू लागला आणित्यामुळे बारा बलूतेदारांवर परिणाम झाला. त्यांचे व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहेत. आधुनिक जमान्यात मातीच्या बांबु, दगडी पाटाची जागा तंत्रज्ञानच्या जमान्यात विविध साहित्याने घेतल्याने या कलाकुसर करणार्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आणि बघता बघता कुंभार, चर्मकार, पाथरवट, बुरुड व्यवसाय फक्त सणासुदी मर्यादित राहिला आहे. तंत्रज्ञानच्या युगात आयटी पार्क, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्याने ग्रामीण भागातील पारंपारिक व्यावसायावर टांगती तलवार आली असल्याने गावचे गावपण व संस्कृती जपणे गरजेचे बनले आहे. अनेक बारा बुलतेदार फक्त सणासुदीचेच्या काळात आपला व्यवसाय करत आहेत तर इतर वेळेस मिळले ते काम करण्यास इतर गावाचा शोध घेत असतात.
पूर्वी कच्च्या मातीच्या वीटाची भिंती, त्यावर लाकूडाचा वापर करून मांडवण केलेली कौलारू घरे होती. सभोवताली अंगणात तुळशी वृंदावन दगडी जाते उखळ, पाट वरवंटा असायचे मात्र आधुनिकरणाच्या जमान्यात कौलारू घराची जागा लोखंडाचा वापर करून सिमेंट काँक्रीटच्या घरांनी घेतली आहे. यामुळे कच्च्या मातीच्या वीटा बनवणारे कुंभार आणि घराचे खांब आणि मांडवण करणार्या सुतारांच्या हाताला काम उरलेले नाही. परिणामी सिमेंट काँक्रीटची बांधण्यात येणारी घरे व इमारतीचा बांधकाम व्यवसायामध्ये स्थानिक कामगारांपेक्षा तालुक्यात सुरू आलेल्या बांधकाम व्यवसायिकांमध्ये परप्रांतीय कामगारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी गावोगावी मुक्काम करत घिसाडी शेतीची अवजारे गृह उपयोगी वस्तु तसेच पितळ तांब्याच्या भांडयांना कल्हई करुन देत असे मात्र आज शेतकर्यांनी शेती बेभरवशाची व तोटयाची झाली असल्याने करण्याचे सोडले आहे. त्यामुळे लोहाराच्या हाताला काम नाही. परिणामी एकादा लोहार तालुक्याच्या ठिकाणी दिसून येत असून शेतकर्याच्या अवजारांची गरज भागवत असल्याचे दिसते आहे तर तांब्यापितळेच्या भांडयाची जागा स्टीलच्या भांडयानी घेतली असल्याने कल्हई करुन चरितार्थ चालणारा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. छन्नी हातोडयाचे दगडावर घाव घालून पाटा, वरवंटा, उखळ आणी जातं आदी वस्तु तयार करणारा पाथरवट इतर व्यवसाय करत जगण्याची धडपड करत आहे.