

पर्यावरण पुरक गणपती उत्सवावर भर दिल्याचे सकारात्मक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पेणमध्ये एकूण 40 लाख मूर्ती तयार झाल्या असून मागच्या वर्षीपेक्षा 20 टक्के अधिक मूर्ती या शाडूच्या तयार झाल्या. यावर्षी एकूण 8 लाख शाडूच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. मागच्या वर्षी हे प्रमाण 6 लाखापर्यंत होते.
यंदा पीओपी गणेशमुर्तींना परवानगी मिळणार की नाही , या बाबतच्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचीकेच्या निर्णयावर गणेशमुर्ती निर्मीतीकरिता सुप्रसिद्ध गणेशनगरी पेण व तालुक्यांतील सर्व मुर्तीकार डोळे लावून बसले होते. काही अटी शर्थींवर न्यायालयाने पीओपी गणेशमुर्तींना परवानी दिली. परंतू दरम्यानच्या काळात घरगुती गणेशमुर्तींच्या बाबतीत ट्रेन्ड बदलला आणि यंदा शाडू मातीच्या गणेशमुर्तींनाच ग्राहकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
वार्षीक 200 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल गणेशमुर्ती व्यवसायातून होते. गतवर्षी एकूण 40 लाख गणेशमुर्तींची निर्मीती करण्यात आली होती. त्यात 32 लाख पीओपीच्या तर 8 लाख शाडू मातीच्या गणेशमुर्ती होत्या.यंदा शाडूमातीच्या गणेशमुर्तींमध्ये आता पर्यंत दोन लाखाने वाढ होवून त्या 10 लाखांवर पोहोचल्या आहेत. दरम्यान पीओपी मुर्तींना न्यायालयाने परवानगी दिल्याने पीओपी मुर्ती तयार करणारे मुर्तीकार सुखावले आहे.
गेल्या एक महिनाभरापासून शाडू मातीच्या गणेशमूर्ती परदेशात रवाना होत असून आतापर्यंत एक लाख शाडू मातीच्या गणेशमूर्त्या अमेरिका, फ्रान्स, दुबईसह सहा ते सात देशात रवाना झाल्या आहेत. तर देशांतर्गत देखील शाडू मातीच्या मुर्त्यांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.मराठी माणसाचा वर्षातील सर्वांत मोठा सण असणारा गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर आला असून 27 ऑगस्ट रोजी यावर्षी गणेशागमन होणार आहे. यानिमित्ताने गेल्या दोन महिन्यांपासून गणेशमुर्ती निर्मितीकरिता पेण तालुक्यात तयार होणार्या गणेशमूर्ती संपूर्ण देशात व परदेशात समुद्र मार्गे रवाना झाल्या आहेत.
गेला महिनाभर दररोज पेण शहरातील कारखान्यातून 1 फुट ते अडीच फुटापर्यंतच्या उंचीच्या गणेशमुर्ती पुठ्याच्या खोक्यात पॅक करून रवाना होत आहेत. या पुठ्याच्या खोक्यातही कागदी पट्टया, पेंढा, कापड यामध्ये गणपतीची मुर्ती सुरक्षितपणे पॅक केली जाते. पुठ्यावर पाठवणार्या गणेशमुर्ती केंद्र मालकाचे नाव तसेच ज्यास पाठवावयाचे आहे त्याचे नाव, शहर, दूरध्वनी असा पत्ता प्रिंट करून सिल पॅक केले जाते. यामुतींची रवानगी करतांना याची वाहतुक सूरक्षितपणे टेम्पोतून पुढे जहाजापर्यंत व रेल्वेपर्यंत केली जाते. तिघून पुढे या मुर्ती देश-विदेशात रवाना होत असतात.
सूबक, लोभस,शांत गणेशमुर्ती, मुर्तीत जीवंतपणा आणमारी डोळ्यांची अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण आखणी यामुळे पेणच्या गणेशमूर्तींंना देशात परदेशात मागणी असते. केवळ पेण शहरात गणेशमूर्ती निर्मितीचे 550 कारखाने आहेत. त्यातील 300 कारखाने बारमाही चालणारेही कारखाने आहेत. त्यापैकी मोजक्याच कारखान्यातील कामगारांना फॅक्टरी अॅक्टप्रमाणे रोजंदारी व अन्य सुविधा दिल्या जातात. इतर बहुतांशी कारखान्यात कामगार रोजंदारीने काम करित असतात.