

डॉ. महेश केळुसकर
संस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिध्द साहित्याचा भाग आहेत तर कांही सुटे सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण होते हे आज आपल्याला ठाऊक नाही. मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर आणि प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातल्या पंडितांनी त्या श्लोकांची संकलनं केली असावीत. आम्ही शाळेत असताना गुरुजींनी आम्हाला अनेक श्लोक पाठ करायला लावलेले होते.
सध्याच्या निवडणुकांच्या मोसमात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भाषणं तुम्ही ऐकली असणार. त्या भाषणांची भाषा आणि त्यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक, मतदारांना नवीन नाही. राजकीय प्रचारसभा पूर्वीही व्हायच्या आणि पक्ष-प्रतीपक्ष करताना एकमेकांवर टीकाही केली जायची. पण त्या भाषेचा दर्जा आणि स्तर कधी आजच्या इतका खाली आला नव्हता. कधी कधी वाटतं, हे राजकीय नेते शाळांमध्ये गेले आणि फक्त साक्षर होऊन बाहेर पडले. आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला पाठ्यपुस्तकांमध्ये सुभाषित माला असा एक पाठ असायचा. त्यामधली सुभाषितं अजून आठवतात आणि आमच्या गुरुजींची शिकवण आजही मनामध्ये एक एक सुभाषित आठवताना उजळत जाते...
सुभाषित म्हणजे सुंदर आणि अर्थपूर्ण वचन किंवा नीतिमूल्ये शिकवणारे सुविचार, जे संस्कृतमधून आलेले आहेत आणि कमी शब्दांत गहन अर्थ सांगतात. श्लोक किंवा बोधवाक्य; हे जीवनाचे तत्त्वज्ञान, सत्य आणि व्यवहारातील ज्ञान देतात आणि नेहमी लक्षात राहतील अशा स्वरूपात असतात. सु म्हणजे चांगले आणि भाषित म्हणजे बोलणे, म्हणून चांगले बोलणे असा याचा शब्दशः अर्थ आहे.
सुभाषितं हे केवळ शब्द नसून जीवनातील तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये, सत्य आणि धडे देणारी पथदर्शक आहेत. सुभाषितांमध्ये एखादा विचार, सल्ला किंवा सत्य छोट्या श्लोकातून (बहुतेकदा चार ओळींच्या) मांडलेला असतो. ती अनेकदा कवितेच्या रूपात असल्यानं आकर्षक आणि स्मरणीय असतात, जणू काही साखरेत गुंडाळलेली औषधं. यात नैतिकता, ज्ञान, मैत्री, देशभक्ती, आणि मानवी स्वभाव यांसारख्या अनेक विषयांचा समावेश असतो. उदाहरणार्थ “आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निष्फळ” हे एक सुभाषित आहे, जे कष्टाचं महत्त्व सांगतं.
थोडक्यात, सुभाषित म्हणजे “चांगले बोललेल” किंवा “सुंदरपणे सांगितलेली गोष्ट” जी मानवी जीवनाला मार्गदर्शन करते. रामदासस्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही जवळ जवळ सुभाषितेच आहेत. त्यातला भक्तीमार्गाचा उपदेश कदाचित सर्वांना भावणार नाही, पण त्याशिवाय रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा खूप सूचना या मनाच्या श्लोकांमध्ये दिल्या आहेत. उदाहरणार्थ -
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ॥
संत नामदेव, तुकाराम, चोखा मेळा आदींचे अनेक अभंग ही सुभाषितेच आहेत. उदाहरणादाखल हे अभंग पाहता येतील:
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ॥
ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार ॥
महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती ॥
जया अंगी मोठेपण | तया यातना कठीण ॥
कमोदिनी काय जाणे तो परिमळ |
भ्रमर सकळ भोगीतसे ॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी |
ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा |
काय भुललासी वरलिया सोंगा ॥
व्यंकटेशस्तोत्रामधील कांही ओव्या सुभाषितासारख्या वाटतात.
समर्थागृहीचे श्वान,
त्यास सर्वही देती मान|
बहिणाबाईंच्या ओव्या तर नक्कीच सुभाषितांसारख्या आहेत. (मूळ अहिराणी बोलीभाषेतल्या ओव्या जराशा शुद्ध मराठी भाषेत दिल्या आहेत.)
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर |
आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर ॥
मन वढाय वढाय, जसं पिकामध्ये ढोर |
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर ॥
अशी अनेक उदाहरणं देता येतील. अलीकडल्या कवींच्या कांही रचनासुद्धा सुभाषितांसारख्या वाटतात.
ग. दि. माडगूळकरांची ही रचना पाहा...
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे |
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे॥
किंवा
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ ॥
कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांनी दातृत्व गुणाचं महत्त्व सांगताना म्हटलंय की,
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे ॥
संस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिद्ध साहित्याचा भाग आहेत, तर कांही सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण हे आपल्याला ठाऊक नाही. मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर व प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातील पंडितांनी त्या श्लोकांची संकलनं केली असावीत. आम्ही शाळेत असताना गुरुजींनी अनेक श्लोक पाठ करायला लावले होते. सरस्वती पूजनाला दरवर्षी आम्ही पुढील श्लोक म्हणून सरस्वतीची पूजा करायचो :
या कुंदेंदू तुषारहारधवला या शुभ्र वस्त्रांवृता
या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतीभिर्देवै:सदावंदिता
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ॥
जी कुंदकळ्या, चंद्र व हिमतुषार याप्रमाणे शुभ्र वर्णाची आहे, जिने शुभ्र वस्त्रे परिधान केलेली आहेत, जिचे हात सुंदर अशा वीणेने शोभून दिसत असून जी शुभ्र पद्मासनावर बसलेली आहे, जिला ब्रह्मा, विष्णू महेशादी देवगण सदैव वंदन करतात आणि जी सर्व प्रकारचे अज्ञान नष्ट करते, अशी देवी सरस्वती सदैव माझे रक्षण करो! आणि संध्याकाळ झाली की पाढे म्हणून आम्ही दीप प्रज्वलित करून ही तेजाची प्रार्थना करायचो :
शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ॥
माझे आरोग्य, धनसंपदा या सर्वांचे कल्याण होऊन शुभ व्हावं आणि शत्रू असलेल्या माझ्या दुष्ट बुद्धीचा नाश व्हावा, अशी प्रार्थना करून हे दीपज्योती मी तुला नमस्कार करतो. आपल्याला माहीत आहे की, सुभाषितं वाचकांचं मनोरंजन करतात, पण जाता जाता व्यवहारज्ञान देतात. शाश्वत सत्यही सांगून जातात. सोबत काव्यानंद देत कोड्यातही टाकतात. कधी कधी विनोद करत एखादं शाश्वत सत्य सुभाषितामधून सांगितलं जातं. याचना करणाऱ्या याचकाला कोणाकडेही भिक्षा मागायची लाज नसते या वास्तवाबद्दल एक विनोदी श्लोक असा...
तृणादपि लघुस्तूल: तूलादपिचं याचक: |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ॥
सुभाषितं ही खरोखरच संस्कृतभाषेतली रत्न आहेत. हे सांगताना कुणा कविने रचलेला हा श्लोक अगदी योग्य आहे :
पृथिव्यां त्रीणी रत्नानी जलमन्नं सुभाषितम् मूढै: पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते ॥
कवी म्हणतो, पृथ्वीवर तीनच रत्ने आहेत. ती म्हणजे पाणी, अन्न व सुभाषित. मूर्ख लोक पाषाणाच्या तुकड्यांना, खड्यांना रत्न म्हणतात. सुभाषितांचे श्लोक वृत्तबद्ध असल्याने ते पाठ व्हायला मदत होते. काही सुभाषितं त्यांच्या वृतांच्या चालीमुळे म्हणायलाही सोपी होतात. लहानपणी पाठ केलेली सुभाषितं आपल्या नकळत आपल्यावर होणाऱ्या सुसंस्कारांमुळे आपल्या जडणघडणीत मोलाची ठरतात. लहानपणी पाठ करताना कदाचित त्या सुभाषितांच्या अर्थाचं गांभिर्य आणि खोली आपल्याला लक्षात येत नसली तरी आपल्याला ती नंतर आयुष्यभर उपयोगी पडतात, मार्गदर्शक ठरतात.