

रायगड : श्रावण मास सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे दर सोमवार आणि शनिवारच्या दिवशी हजारो भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शांत निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि धार्मिक ऐतिहासिकतेचा ठसा लाभलेले हे स्थान सध्या अध्यात्मिक उर्जेने भारले आहे.
हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात स्थित असून, ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. श्री शंकराचे येथे त्रिलिंग रूपात दर्शन घेता येते. शंकर, विष्णू आणि ब्रह्मा या त्रिदेवांची एकत्र उपासना येथे होणारे हे एक दुर्मिळ तीर्थ आहे.
श्रावण मासातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारचे दिवस शंकर उपासनेसाठी विशेष मानले जातात. याच पार्श्वभूमीवर, हरिहरेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक अभिषेक, रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक आणि विविध धार्मिक विधींसाठी येत आहेत. मंदिर परिसरात दिवसभर हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण भक्तिरसाने भारलेले असते.
स्थानिक आख्यायिकेनुसार, प्राचीन काळात ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनी येथे एक महायज्ञ केला होता. यज्ञात विघ्न आल्यामुळे शंकर कालभैरव रूपात प्रकट झाले आणि या स्थळाचे पावित्र्य अधिक वाढले. मंदिर परिसरातील ब्रह्मा पॉईंट, गौतम तीर्थ, पांडव तीर्थ, महाशिव तीर्थ, साक्षभैरव मंदिर, अगस्तीगुहा ही स्थळे भक्तांसाठी अध्यात्मिक प्रेरणास्थाने आहेत. हरिहरेश्वर हे केवळ धार्मिकच नव्हे, तर निसर्गप्रेमींनाही आकर्षण वाटणारे ठिकाण आहे. समुद्रकिनारा, डोंगररांगा आणि स्वच्छ हवा यामुळे येथे आल्यावर मनाला शांतता लाभते. यासोबतच हिम्मतगड किल्ला, सोमजाई मंदिर, कुसुम मंदिर, श्रीवर्धन बीच ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग बनली आहेत.
श्रीहरिहरेश्वर येथे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांचे एकत्रित सान्निध्य लाभते. श्री कालभैरवाच्या पश्चिमद्वारी महाबळ दैत्याचा पराभव झाल्याने या स्थळाचे महत्व अधिक वाढले. सावित्री व कृष्णा नद्यांच्या उत्पत्तीची पौराणिक कथा या भूमीशी निगडीत आहे, जिथे शंकराने हरिहर पर्वताची निर्मिती केली. प्राचीन यज्ञसंस्कृतीचा इतिहास लाभलेल्या या क्षेत्रात भक्तांना अपार आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो. येथे होणारी कालभैरव व हरिहरेश्वर यांची पूजा श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरते. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे स्थान भक्तांसाठी आजही आत्मिक उन्नतीचे दैवी स्थळ आहे.
विश्वनाथ वामन बोडस गुरुजी, हरिहरेश्वर
श्रीवर्धन समुद्रकिनारा सुद्धा सौंदर्य व स्वच्छतेमुळे भावतो. बाणकोट किल्ला, गणेश गल्ली आणि भागमंडळा ही स्थळं इतिहासप्रेमींना भुरळ घालतात. याशिवाय, सोमजा देवी मंदिर, घुश्मेश्वर मंदिर, आणि दिवेआगर बीच ही ठिकाणं प्रवासात भर घालणारी आणि मन प्रसन्न करणारी आहेत.
अमित खोत, माजी सरपंच, हरिहरेश्वर ग्रामपंचायत