

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : ऑबेराय नामक तरुणाने नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री करून तिला अश्लील फोटो पाठविण्यास भाग पाडून तिचे हे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरोधात विनयभंग, पोक्सो तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकणातील १६ वर्षीय पीडित मुलगी नवीन पनवेल भागात राहण्यास असून, ती सध्या शिक्षण घेत आहे. पीडित मुलीचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. याचाच फायदा उचलत गेल्या मे महिन्यात ऑबेराय नामक तरुणाने पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत भावनिक संवाद साधून तिचे अश्लील फोटो पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने पीडित मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. पालकांनी तत्काळ खांदेश्वर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.