

पेण : पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोली खारबंदिस्ती नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आ.रवींद्र पाटील यांनी दिले आहे.याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत आ.पाटील यांनी पेण निवासस्थानी तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
खारेपाट भागातील कणे - कोप्रोली या खारबंदिस्तीची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था निर्माण झाली होती. तर ही बंदिस्ती बांधताना जी शेतकर्यांना आश्वासने दिली होती त्याची ठेकेदारांकडून पूर्तता केली गेली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्यांमध्ये या कामाबाबत आणि ठेकेदाराबाबत संताप निर्माण झाला होता. त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दैनिक पुढारीने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि गाव समिती तसेच,ठेकेदार व खार भूमीविकास अधिकार्यांच्या समवेत बैठक घेतली. या शेतकर्यांना न्याय कसा मिळवून देता येईल आणि काम चांगल्या प्रतीचे कसे होईल याबाबत निर्णय घेण्यात आले.
कणे - कोप्रोली या खराबंदिस्तीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आणि ठेकेदाराचे आश्वासन फोल ठरत असल्याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ, गाव समिती यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे तसेच प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे तातडीची बैठक आमदार रवींद्र पाटील यांनी घेऊन नुकसान भरपाई बाबत निर्णय झाला आहे.
राजेंद्र म्हात्रे, अध्यक्ष गाव समिती - कणे