

Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh
रायगड : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा एक ऐतिहासिक क्षण घडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषीकेश यादव आणि माधव फडके यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी मंचावर मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभाग संचालक तेजस गर्गे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ असे एकूण १२ किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत महासंघाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सर्व किल्ल्यांच्या टू-द-स्केल प्रतिकृती केवळ अडीच महिन्यांत तयार करण्यात आल्या. महासंघाच्या सदस्यांनी किल्ल्यांवर जाऊन वास्तूंची मोजमापे घेतली आणि त्या प्रमाणात प्रतिकृती साकारल्या. या प्रतिकृती दिल्लीतील भारत मंडपममध्ये झालेल्या सांस्कृतिक प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या, जिथे देश-विदेशातील पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले. युनेस्कोच्या शिष्टमंडळालाही या उपक्रमाने विशेष प्रभावित केले.
महासंघाने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा राबवून किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी सातत्याने काम केले आहे. या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार’ महासंघाला दिला. पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
या गौरवाबद्दल बोलताना अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले, “हा पुरस्कार सर्व शिवप्रेमी, दुर्गनिमी गिर्यारोहक स्वयंसेवक आणि गडकोटांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा आहे.” कार्याध्यक्ष हृषीके यादव यांनी सांगितले की, “या पुरस्कारामुळे किल्ल्यांचे भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे जतन करण्याची जबाबदारी वाढली आहे.”