

महाड (रायगड) : श्रीकृष्ण बाळ
सामाजिक व ऐतिहासिक क्रांतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड शहरातील चित्रपट रसिकांना तसेच नाट्य रसिकांना गेल्या सात दशकांपेक्षा जास्त काळापासून सेवा देणाऱ्या शहरांतील गांधी टॉकीज व सुंदर चित्रमंदिरच्या मालकांनी आर्थिक नुकसानीची जबाबदारी स्वीकारत ही दोन्ही चित्रपटगृहे काही वर्षापासून बंद केली आहेत. यामुळे महाड शहरात सध्या पीजी मिनी फ्लेक्स हा एकमेव आधार रसिकांना राहिला असून या ठिकाणी प्रेक्षक संख्येची असणारी अट शिथिल करावी अशी मागणी महाड मधील चित्रपट रसिकांकडून व्यवस्थापनाला करण्यात येत आहे.
शहरात एकेकाळी गांधी टॉकीज आणि सुंदर चित्रमंदिर या दोन चित्रपटगृहांत चित्रपटांचा गजर रंगत असे. अनेक वर्षांपूर्वी सुंदर चित्रमंदिर बंद झाले आणि मागील वर्षी ऐतिहासिक गांधी टॉकीजचेही दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले.
पूर्वी शहरातील गांधी टॉकीज येथे दिवसाचे तीन शो नियमित चालत असत. प्रेक्षक संख्या कमी असली, तरीही ते शो दाखवले जात असल्याने चित्रपटरसिक बिनधासपणे कोणत्याही वेळी हवे तेव्हा चित्रपट पाहायला जात असत. मात्र आता परिस्थिती बदलली असून, पीजी मिनीप्लेक्समध्ये प्रेक्षकसंख्येची अट असल्याने शो रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या महाड व पोलादपूर तालुक्यांसह लगतच्या मंडणगड व खेड तालुक्यांकारिता देखील हेच एकमेव चित्रपटगृह कार्यरत आहे. मात्र येथे शो सुरू करण्यासाठी किमान आठ ते दहा प्रेक्षक उपस्थित असणे बंधनकारक आहे. कमी प्रेक्षक असल्यास शो रद्द केला जातो.
चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, कमी प्रेक्षकांमध्ये शो दाखवणे थिएटरचे मेन्टेनन्स व मोठमोठ्या एसींमुळे येणारे लाईटबिल यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आठ ते दहा प्रेक्षकांची अट ठेवावी लागते. यामुळे देखील अनेकदा आर्थिक तुट होते. शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशीच शोसाठी प्रेक्षकसंख्या पूर्ण होते. मात्र आठवड्याच्या इतर दिवशी चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षक रिकाम्या हाताने परत जातात.
महाड-पोलादपूर तालुक्यातील हे एकमेव चित्रपटगृह असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षांवर परिणाम होत आहे. शहरात दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने किमान शो रद्द करण्याची अट शिथिल करून प्रेक्षकांचा विचार करावा, अशी मागणी चित्रपट रसिकांकडून होत आहे.
टॉकीज पुन्हा सुरू करण्याचा मानस
यासंदर्भात गांधी टॉकीजचे मालक अमोल गांधी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता ऐतिहासिक महाडमधील १९३६ यावर्षी सुरू झालेले गांधी टॉकीज हे अनेक घटनांचे साक्षीदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वीच आपण टॉकीज बंद करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घेतल्याचे नमूद केले. मागील चार-पाच वर्षापासून होणारे आर्थिक नुकसान हे अधिक होऊ लागल्याने दुर्दैवाने आपण हा निर्णय घेतल्याचे सांगून येणाऱ्या काळात ऐतिहासिक असणाऱ्या या टॉकीजचे कामकाज पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही कुटुंबीय विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.
आर्थिक तोटा व पार्किंग सुविधेचा अभाव
शहराच्या अंतर्गत भागात असलेल्या 'सुंदर' चित्रपटगृह बंद करण्यामागे आर्थिक नुकसान हे प्रमुख कारण असून या ठिकाणी येणाऱ्या चित्रपट रसिकांना पार्किंग सुविधा देता येऊ शकत नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सुंदर चित्र मंदिराचे समीर मेहता यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. १० डिसेंबर १९५४ रोजी सुंदर चित्रमंदिर सुरू करताना पहिले काही दिवस एक शो दाखविला जात असे. त्या पश्चात काही वर्ष नाटकांचे प्रयोगही या चित्रमंदिरात झाल्याची माहिती दिली.