

कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरुन वरसगांव ते विळा मार्गांवरील चिंचवली गावानाजिक कालव्याचा पुल हा अखेरची घटका मोजत आहे या पुलाचे संरक्षण कठडे तुटले असुन पुलाला ही तडा गेल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे या मार्गांवरून प्रवास करणार्या वाहन चालकांसहित प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला याकडे सार्वजनिक बांधकाम खाते यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. वरसगांव-भिरा मार्गांवरील चिंचवली गावानाजिक कालव्याच्या पुलाला असणारे संवरक्षण कठडे गेली अनेक दिवसापासून तुटून कालव्यात पडले आहेत तर पुलाला तडे गेले आहेत परंतु त्यावर कोणतेही उपाय योजना करण्यात आलेली नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वरसगांव-भिरा मार्गांवर विळा भागड येथे मोठी पोस्को कंपनी असुन येथे जाणार्या असंख्य अवजड वाहने चिंचवली नजिक असलेल्या कालव्याच्या पुलावरून येजा करीत आहेत. तर वरसगांव ते विळा मार्गी पुणे जाण्यासाठी हा नजिकचा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी दिसून येते परंतु चिंचवली नजिकच्या असणारा पुल हा अगोदर अरुंद असल्यामुळे एकाच वेळी समोरासमोरील वाहने एकत्र आल्याने फार मोठी समस्या निर्माण होत आहे. तर पुलाचे कठडे तुटल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गांवर 20 ते 25 गावांचा समावेश येत असुन या गावातील शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, तसेच कोलाड बाजारपेठेत जाणारे असंख्य नागरिक मोटार सायकल, थ्रीव्हीलर, फोर व्हीलर, एसटी बसने येजा करीत असतात या पुलावरून येजा करीत असतात. यामुळे या मार्गांवर मोठया प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे भरधाव वेगात वाहने चालविण्याच्या नादात कालव्याचे कठडे तुटल्यामुळे एखादे वाहन कालव्याच्या पाण्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे काही महिन्यांपूर्वी दोन टुव्हीलर स्वार कालव्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत.
वरसगांव-भिरा मार्गांवरील चिंचवली नजिक असलेल्या कालव्यावरील पुलाचे संवरक्षण कठडे एक वर्षांपासून तुटले असुन पुलाला तडा गेला यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. स्थानिक लोकनेते मात्र महाराष्ट्राच्या विकासाच्या वल्गना करीत आहेत. मग गावाकडील विकासाकडे दुर्लक्ष का करीत आहेत.
भिवा पवार, रा. जि. एकलव्य आदिवासी सामाजिक विकास संघटना,जिल्हा अध्यक्ष