छत्रपती शिवराय विश्वासाठी प्रेरणास्थान : ना. अमित शहा

महापुरुषांंचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे : मुख्यमंत्री
chhatrapati-shivaji-an-inspiration-to-the-world-says-amit-shah
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याला अभिवादनप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री आशिष शेलार, मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर.Pudhari File Photo
Published on
Updated on

किल्ले रायगड : परकीय आक्रमणांना दूर करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा किल्ले रायगड हा देशासह संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आणि छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धाराच्या शतकपूर्ती सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले. ज्या तथाकथित आलमगीराला (औरंगजेब) शिवाजी महाराजांनी या भूमीत पराभूत केले, त्याची समाधी इथे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपतींचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरून लोटावे, असे वाटते. पण लोकशाही व कायद्याचे राज्य असल्याने याबाबत योग्य तो कायदा करण्यात येईल. उदयनराजे भोसले यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याबाबतही आम्ही योग्य कारवाई करणार आहोत.

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल पुरोहित, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.

शिवरायांवर राजमाता जिजाऊंचे संस्कार

सुमारे पंधरा मिनिटांच्या भाषणामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध कार्याचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली स्वधर्माची लढाई थांबता कामा नये, असे सूचित करून समग्र विश्वात भारताचा झेंडा गौरवांकित करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत होत असल्याचे शहा यांनी नमूद केले. ते म्हणाले, राजमाता जिजाऊंनी शिवरायांना फक्त जन्मच दिला नाही तर बाल शिवरायांना त्यांनी स्वधर्मासह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. त्यांचे संस्कार शिवरायांना महान बनवणारे होते. छत्रपतींचे सुवर्ण सिंहासन असलेल्या भूमीला वंदन करून शिवरायांना अभिवादन केले, त्यावेळी मनात आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. स्वराज्य, स्वधर्म यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचले. आदिलशाहीने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवरायांकडून प्रेरणा घेऊनच मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले.

स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा छ. शिवरायांकडून पराभूत झाला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रे वाचली आहेत. मात्र असे साहस एकाही नायकामध्ये पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज होते म्हणून स्वधर्म, भाषा आणि देश वाचला. स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा शिवरायांकडून पराभूत झाला आणि त्याची समाधी (कबर) महाराष्ट्रात झाली, असे आवर्जून सांगून अमित शहा यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.

गुलामगिरीची मानसिकता तोडून स्वराज्य वास्तवात आणले तीच ही राजसभा आहे. आज मी इथे कोणतेही राजकारण करायला आलो नाही तर माझ्या आत्म्याला शिवरायांच्या पराक्रमाची, शौर्याची अनुभूती करून घेण्याकरिता आलो आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ हेच आजच्या कॅबिनेटचे विस्तारित स्वरूप आहे, असे नमूद करून केंद्रीय मंत्री अमित शहा पुढे म्हणाले, शिवाजी म्हणजे संकल्प, शिवाजी म्हणजे समर्पण, शिवाजी म्हणजे बलिदान, शिवाजी म्हणजे शौर्य, शिवाजी म्हणजे स्वाभिमान आणि शिवाजी म्हणजे स्वराज्य निर्मितीची शक्ती, अशा शब्दांत शहा यांनी छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला.

महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले : उपमुख्यमंत्री शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या रायगडने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. तसेच रायगडने महाराजांचा शेवटचा दिवसही पाहिला. महाराजांचे आयुष्य अवघ्या 50 वर्षांचे होते. ते आणखी 20 ते 30 वर्षे असते तर आपला सगळा इतिहासच बदलून गेला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी हे ऐतिहासिक कार्य केले नसते तर आपण सर्व गुलामगिरीत असतो. छत्रपती शिवरायांमुळे आपले अस्तित्व असल्याचे सांगत शिवरायांचे विचार जपले पाहिजेत, असेही शिंदे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. आज देशातील कुपवाडा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, रशियामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमारचे जनक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा साम्राज्याची शिवमुद्रा नौदलाच्या ध्वजावर घेण्याचे काम केले. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती महाराजांची वाघनखे देशात परत आणली, ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे : खा. उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण व्हावे, अशी मागणी यावेळी केली. गेल्या काही वर्षांपासून छत्रपतींच्या कुटुंबीयांबद्दल केली जाणारी वक्तव्ये ही दुर्दैवी असून, अशी वक्तव्ये करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याकरिता शासनाने स्वतंत्रपणे कायदा तयार करावा. त्याला दहा वर्षांपर्यंत जामीन मिळणार नाही, अशी तरतूद करावी, अशी आग्रही मागणी खा. भोसले यांनी केली. भारताच्या लोकशाहीचा पाया हा छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यापासून दिसून येतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा ज्या आपल्या मातोश्री राजमाता जिजाऊ मांसाहेब व शहाजीराजांकडून घेतली, त्या शहाजीराजांची समाधी कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे उद्ध्वस्त अवस्थेत असून त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने आर्थिक निधीची तरतूद करावी, असेही ते म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांचा विशेष सत्कार

यावेळी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने देण्यात येणार यंदाचा श्री शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंगजी होळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनाही त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायमुद्रा स्मरणिकेचे प्रकाशन व गडारोहण स्पर्धा बक्षीस वितरणही करण्यात आले.

शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक

राजदरबारातील कार्यक्रम संपल्यानंतर राजदरबार ते शिवसमाधी अशी श्री शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्या ठिकाणी शिवछत्रपतींना रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यंदाच्या वर्षापासून केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवरायांच्या समाधीवर विभागाच्या वतीने प्रतिवर्षी पुष्पवृष्टी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याची सुरुवात करण्यात आल्याबद्दल मंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री मोहोळ यांना धन्यवाद देण्यात आले. दरम्यान पहाटे पाच वाजता श्री जगदीश्वर मंदिरामध्ये विधिवत पूजाअर्चा होऊन सहा वाजता श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

दरम्यान, शिवपुण्यतिथी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री सात वाजता शिवसमाधी व जगदीश्वर मंदिरामध्ये दीपवंदना, रात्री साडेआठ वाजता राजसदरेवर पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती तर साडेनऊ वाजता ‘ही रात्र शाहिरांची’ या कार्यक्रमांतर्गत शाहीर सुरेश सूर्यवंशी यांनी दमदार अदाकारी सादर केली. रात्री दहा वाजता श्री जगदीश्वर प्रांगणात हरी जागर झाल्यानंतर पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

राजमाता जिजामाता समाधीस गृहमंत्र्याचे वंदन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पाचाड येथे दाखल झाले. तिथे त्यांनी जिजाऊंना वंदन केले. त्यानंतर अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमवेत रोप वेने रायगड किल्ल्यावर दाखल झाले. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. यावेळी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

शिवस्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. कुठल्याही परिस्थितीत हे स्मारक झाले पाहिजे आणि आम्ही ते करणारच, असे सांगून फडणवीस म्हणाले, दिल्लीत शिवस्मारक झाले पाहिजे ही मागणी अत्यंत योग्यच आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांंच्याकडे हा विषय घेऊन जाऊ आणि मान्य करून आणू. अमित शहा शिवरायांचे सेवक आणि इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगाच्या इतिहासाचा गाढा अभ्यास केलेले, जगभरातून पुरावे मिळवून लेखन आणि वाचन केलेले भारताचे गृहमंत्री या ठिकाणी आले आहेत याचा मला खूप अभिमान आहे. आज देशातील 12 किल्ले विश्व वारसा म्हणून ओळखले जाणार असल्याचे सांगत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news