

इलियास ढोकले : प्रसाद पाटील
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा माघ शुद्ध सप्तमी रोजी तिथी नुसार राज्याभिषेक सोहळा देखील संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाप्रमाणेच पुढील वर्षापासून करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर शेकडो शिव संभाजी भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. नामदार भरत शेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहताना पुढील वर्षीपासून हा सोहळा अधिक भव्य दिव्य करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांनी व त्या पश्चात देव देश आणि धर्माच्या रक्षणार्थ छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले बलिदान हे तमाम भारतवासीयांना आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्र प्रथम या घोषणेनुसार हिंदवी स्वराज्याच्या काळापासूनच आपण सर्वजण भगव्याचे पाईक म्हणून कार्यरत असल्याचे सांगून या आठवड्यात रायगड मध्ये येणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी मोहिमे संदर्भात सर्वांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या स्वागतासाठी व सर्व शिवभक्तांना त्यांच्या आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले.
या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची आज दुपारी चार वाजता महाड विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ही मोहीम नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या ऐतिहासिक गावापासून सुरू होणार असून ती चार दिवसाच्या प्रवासानंतर किल्ले रायगडावर संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंत्रिमंडळाची असलेल्या बैठकीमध्ये गैरहजर राहण्याची परवानगी घेतल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजदरबारा मधील प्रमुख कार्यक्रमांमध्ये सकाळी गडपूजन, ध्वजवंदन झाले. होळीच्या मैदानात शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर पारंपारिक ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, जय शंभुराजे असा जयघोष सुरू होता.
पालखी सकाळी नऊ चे सुमारास राज सदरेवर येताच मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीवर जलाभिषेक, मुद्राभिषेक करण्यात आला.
तत्पूर्वी शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला. राज सदरेवरील मेघ डंबरी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. भगवे झेंडे, भगव्या पताका आणि शंभू राजांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सिद्धेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ले रायगड व परिसरात या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे नामदार भरत शेठ गागावले यांनी कौतुक करून शिवशंभू भक्त म्हणून व स्थानिक नागरिक म्हणून यापुढे देखील अधिक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी सर्वांनी सिद्ध व्हावे असे आवाहन केले आहे.