

नेवाळी : नवी मुंबई महापालिकेत गेलेल्या दुर्लक्षित 14 गावांमध्ये केमिकल माफियांनी हैदोस घातला आहे. गावांमधून वाहणार्या उत्तरशिव नदी पात्रात शुक्रवारी मुसळधार पावसाचा फायदा घेत घातक रसायन सोडले गेल्यामुळे नदी पुन्हा फेसाळली असल्याचे चित्र दोन दिवसांपासून दिसत आहेत.
दरम्यान कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांची प्रदूषणाच्या जाचातून कधी सुटका होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चौदा गावांना प्रदूषणाने ग्रासले आहे. ठाकूरपाडा, दहिसर परिसरात असलेल्या घातक रसायनांच्या गोडाऊनमधून दिवसाढवळ्या रसायन सोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नदीपात्रात सोडण्यात येणार्या या केमिकलचा सत्रांमुळे नदी कधी रंग बदलते तर कधी फेसाळलेली दिसून येत आहे.
या प्रदूषणाबाबत सातत्याने 14 गावांचे नाव पुढे येत असतानाही प्रदूषण नियंत्रण महामंडळ या प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. 14 गावांमधून वाहणार्या या नदीचे पाणी थेट देसाई खाडीला जाऊन मिळते. मात्र नदी काठी चरायला येणार्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे. या परिसरात वर्दळ असलेल्या वन्यजीवांनी प्रदूषणाच्या जाचातून स्थलांतर केल्याचे चित्र दोन दिवसांपासून दिसत आहे. दररोज वन्य जीवांची असलेली वर्दळ 14 गावात प्रदूषणाने रोखली तरी नदीतील प्रदूषणास आळा घालण्यास कुणी पुढाकार घेताना दिसून येत नाही.
या प्रदूषणासंदर्भात तत्कालीन आ. राजू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळ व अधिकार्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर तत्काळ महसूल विभाग, ग्रामविकास अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने गोडाऊन बंद करण्याची नोटीस संबंधितांना दिली होती. मात्र विधानसभा निवडणूक संपताच पुन्हा गोडाऊन जैसे थे सुरू होऊन 14 गावांच्या डोक्यावर प्रदूषणाचे ढग व नदीत रासायनिक पाणी दिसू लागले आहे.
14 गावांमध्ये असलेल्या ठाकूरपाडा डोंगरावर रसायनांचे मोठं मोठे अनधिकृत गोडाऊन सुरू करण्यात आले आहेत. नियम धाब्यावर बसवून सर्रास केमिकल नदी पात्रात टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा गोडाऊनच्या जागी कारवाईसाठी पोहोचत नसल्याने नदी प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या परिसरात सातत्याने आगीच्या घटना देखील घडत असल्याने याचा त्रास अग्निशमन दलाला देखील सहन करावा लागत आहे. आग लागल्यानंतर मालकच पसार होत असल्याने त्यात असलेल्या रसायनांच्या माहिती मिळत नसल्याने अग्निशमनदलाचे जवान देखील त्रासलेले दिसून येतात.