Central Railway news: मध्य रेल्वेची सुरक्षा कडक! ऑक्टोबर-2025 मध्ये 8184 गुन्हेगारांना अटक; 38.03 लाख दंड वसूल
रोहे: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) ऑक्टोबर-2025 महिन्यात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करत मोठी कारवाई केली आहे. रेल्वे मालमत्ता, स्थानके आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफने या एका महिन्यात रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली 8184 गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. या कारवाईतून दंड म्हणून तब्बल ; 38.03 लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. रेल्वे परिसरात गैरकृत्ये करणाऱ्या घटकांना आळा घालण्यासाठी आरपीएफने गोपनीय माहितीच्या आधारे अनेक यशस्वी छापे टाकले.
प्रमुख गुन्हे आणि कारवाईचा तपशील
महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 243 जणांवर कलम 162 अन्वये गुन्हा दाखल करून 62200 रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) कायद्याअंतर्गत 59 जणांना अटक करण्यात आली आणि चोरीच्या वस्तूंसह 4.62 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. 8.21 लाख रुपये किमतीची दारू, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि इतर गुन्ह्यांसाठी 162 जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPFचे विशेष उपक्रम
आरपीएफ प्रवाशांची, विशेषतः महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी २४ तास कार्यरत आहे आणि त्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. रेल्वे परिसर आणि गाड्यांवरील हालचालींवर सीसीटीव्ही देखरेख प्रणालीद्वारे २४x७ लक्ष ठेवले जाते. वंदे भारत, राजधानी एक्सप्रेस, मेल, एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्यांमध्ये आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून एस्कॉर्टिंग (सुरक्षा सोबत) केले जाते.
महिला सुरक्षेवर विशेष लक्ष
रात्रीच्या वेळी उपनगरीय गाड्यांच्या महिला डब्यांचे सुरक्षा कर्मचारी एस्कॉर्टिंग करतात. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी "मेरी सहेली" आरपीएफ पथके तैनात आहेत. मुंबई विभागात 54 "स्मार्ट सहेली" व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून त्यात 23 हजार 338 महिला सक्रियपणे सहभागी आहेत. ईएमयू रेक्सच्या सर्व 788 महिला कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन टॉक बॅक (ETB) प्रणाली बसवण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी उपनगरीय गाड्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यात आरपीएफ कर्मचारी तैनात केले जातात, जेणेकरून स्थानकावरून ट्रेन सुटताना होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवता येईल. मध्य रेल्वेचे आरपीएफ दल सचोटी, दक्षता आणि सार्वजनिक सेवेचे सर्वोच्च मानक राखून प्रवाशांची आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

