

रोहा : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील संपर्क अधिक वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बेंगळुरू (SMVB) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान नियमित 'द्विसाप्ताहिक एक्सप्रेस' सेवा सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गाडीला रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला असून, याचा मोठा फायदा जिल्ह्यातील आणि परिसरातील प्रवाशांना होणार आहे.
गाडी क्रमांक १६५५३/१६५५४ एसएमव्हीबी बेंगळुरू - लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ही सेवा २४ मे २०२६ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून नियमितपणे दर रविवार आणि बुधवारी सुरू होईल. गाडी क्रमांक १६५५४ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवार आणि बुधवारी रात्री २३:१५ वाजता सुटेल आणि बेंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी रात्री २२:३० वाजता पोहोचेल.
तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १६५५३ एसएमव्हीबी बेंगळुरू - लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक एक्सप्रेस २३ मे २०२६ पासून बेंगळुरू येथून दर शनिवार आणि मंगळवारी धावेल. गाडी क्रमांक १६५५३ बेंगळुरू येथून शनिवार आणि मंगळवारी रात्री २०:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या एक्सप्रेस गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज जंक्शन, बेळगावी, धारवाड, एस.एस.एस. हुबळी जंक्शन, करजगी, दावणगेरे आणि सम्पिगे रोड हे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक १६५५४ च्या तिकिटांचे आरक्षण (बुकिंग) बुधवार, २० मे पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. प्रवाशांनी या नवीन गाडीच्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.