Dr. C.D. Deshmukh memorial Roha : रोह्यात डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे स्मारक उभारा
रोहे : महादेव सरसंबे
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्राच्या अस्मिताचा प्रश्न निर्माण झाला असताना आपला करारी स्वाभिमानी बाणा दाखवत केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉ. चिंतामणराव देशमुख महाराष्ट्राचे कंठमणी झाले होते. रोह्यावर प्रेम असलेले डॉ. सी.डी. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण रोह्यात झाले होते. असे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे रोह्यात स्मारक व्हावी अशी रोहेकरांची मागणी आहे.
राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन प्रांतरचनेनुसार मराठी भाषिकांवर अन्याय व सरकारने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी स्वतंत्र करण्याचा घाट घातल्यानंतर स्वाभिमानी बाणा दाखवत डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. म्हणून ते महाराष्ट्राचे कंठमणी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी राजीनामा डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी दिला होता.
महाड तालुक्यातील नाते येथे त्यांचा जन्म झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण तळा व रोहा येथे झाले. रोहा येथे पाचवी ते सातवीच्या शिक्षण त्यांनी घेतले. त्याचे पुढील शिक्षण अलिबाग, मुंबई व पुढे जाऊन इंग्लंड येथे झाले. त्यांच्यात अफाट बुद्धिमत्ता असल्याने देशाच्या सुरुवातीच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे काम महत्त्वपूर्ण ठरले आहे. मूळचे ते रोहयाचे असल्याने रोह्यावर त्यांचे प्रेम म्हणून लंडन येथील त्यांच्या घरास रोहा हे नाव त्यांनी दिले.
स्थानिकांना रोजगार मिळावा ही त्यांची संकल्पना होती. यातूनच पुढे जाऊन रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्राची मुहूर्त मेढ त्यांनी रोवली. त्यांच्या घरी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली होती. त्यांच्या नावाने रोह्यामध्ये खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने डॉ. चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात आले होते. ज्या नाट्यगृहाच्या येथे स्मारक तयार करण्यात आले होते त्या नाट्यगृहाचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे.
रोहा शहरात कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य महाविद्यालय, रोहा अष्टमी नगरपरिषदेचे डॉ.सी.डी. देशमुख कन्या शाळा आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य महाविद्यालय व सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा यांच्यावतीने दरवर्षी महाविद्यालयीन व खुले गटासाठी डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात येत असतात. परंतु त्यांना साजेसे असे रोह्यात राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी रोहेकरांची इच्छा आहे.
सी.डी. देशमुख यांची जन्मभूमी महाड-नाते असले तरी कर्मभूमी रोहा आहे. सी.डी. देशमुख यांच्या नावाने गेली 25 वर्ष रोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार दिला जातो. रोह्यात देशमुख यांचे स्मारक व्हावे अशी आमची शासनाकडे रोहेकरांची विनंती आहे. रोहा येथील त्यांच्या याच निवासस्थानी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भोजन केले आहे.
विजय देसाई, रोहेकर नागरिक
दिवाणी न्यायालय 1904 मध्ये रोह्याला सुरू झाल्यामुळे त्यांचे वडील वकीलीसाठी रोह्याला आले. रोह्यातील धनगर आळी येथे माध्यमिक शिक्षण सुरू केले आणि पाचवी ते सातवी अभ्यासक्रम दोन वर्षात पूर्ण केला आणि पुढील शिक्षणासाठी अलिबाग व मुंबई येथे गेले. त्यापुढील शिक्षणासाठी लंडन गेले. आयएस परीक्षा पास झाल्यानंतर येथेच एका ब्रिटिश युवतीबरोबर विवाह केला आणि नंतर बॅरिस्टर परीक्षा पण दिली. त्यांना 1952 ला त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले. परंतु ते म्हणाले मला माझा कोणत्याही गावाशी संबंध राहिला नाही. नेहरूंनी त्यांना सांगितले, तुम्ही भारताचे अर्थमंत्री म्हणून संपूर्ण भारत तुम्हाला ओळखतो. तुमच्या प्रचाराला मी येईन. नेहरू व्यक्तीगत प्रचारांमध्ये जात नव्हते ते फक्त पक्षाचा प्रचार करायचे परंतु ते सी.डी. देशमुखांच्या प्रचारासाठी आले, त्यावेळी ते त्यांच्या आईला भेटले. मुंबईसह महाराष्ट्र करायचे नाही, असा शासनाने निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
डॉ. श्रीनिवास वेदक, इतिहास संशोधक व सी.डी.देशमुख पुस्तक लेखक

