

खाडीपट्टा (रायगड): महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात सद्या काजुच्या बियांना मोठ्या प्रमाणात मागणी असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजुला आदीवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया विकताना पहायला मिळत आहेत.
सद्या काजूच्या बिया विकून उदरनिर्वाह चालवण्यासाठी या बांधवांची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खाडीपट्टयातील रोहन, तुडील फाट्यासह म्हाप्रळ फाटयाच्या रस्त्यालगत सद्या आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या सोळलेल्या बिया विकत आहेत आणि त्या बियांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे.
खाद्यामध्ये काजूच्या बियांना मोठी पसंती असल्याने जेवणाच्या रस्स्यामध्ये काजूच्या बिया म्हणजे जेवणाची चव वेगळीच. या एक-दिड महिन्याच्या कालावधीसाठी महाड खाडीपट्टा येथील आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया विकून आपला उदरनिर्वाह करताना पाहायला मिळत असतात. शेकडो काजूच्या बिया घेऊन या महिलावर्ग महाड-म्हाप्रळ रस्त्यावरील रोहन फाटा, जुई, तुडील तसेच म्हाप्रळ आदी ठिकाणी रस्त्यालगत पाहायला मिळत आहेत.
सद्या काजुच्या बियांना मोठया प्रमाणात मागणी आहे. सद्या कोकणात काजूचा हंगाम सुरू असून तालुक्यातील खाडीपट्टयात राष्ट्रीय महामार्गावरील तुडील, जुई, कुंबळे, रावढळ तसेच म्हाप्रळ या ठिकाणी दररोज आदिवासी बांधव, भगिनी काजूच्या बिया फोडून त्या 200 रूपये शेकडा प्रमाणे विकण्यांत मग्न पाहायला मिळतात. त्यांना विचारले असता दररोज मोठ्या प्रमाणात मुंबईकडे जाणारे चाकरमानीसह स्थानिक नागरिक खरेदी करतात. दरम्यान, विटभट्टी वरील कामे देखील सुरू असून फावल्या वेळात आणखी संसाराला जोड मिळावी म्हणून येथील आदीवासी बांधव या कामाकडे वळले आहेत. काजूच्या बियांची साळ काढल्यानंतर शेकडा 200 ते 250 रूपये दराप्रमाणे काजूच्या बिया विकत आहेत. काजूच्या बियांची साळ काढणे मोठे जिकरीचे काम असून बिया फोडताना बियांमधून अंगावर उडणारा चिक अंग काळे करून टाकते असे आदीवासी ताईंनी सांगितले.
येथील आदिवासी बांधव शेती, बागा साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी राखणीच्या कामाला असतात. कित्येक ठिकाणी तेथील राखण करताना काजूच्या झाडांची राखण ही त्यांच्या देखरेखेखाली होत असल्याने निम्मा हिस्सा हा राखणकर्ता आदिवासी बांधव ठरवून घेतात. त्यामूळे काजूच्या बिया विकून उदरनिर्वाह करणे आता या आदिवासी बांधवांचे जीवन बनले आहे. दिवसभर काबड कष्ट आणि रात्री भेटेल तेथे निवारा असा या समाजाचा विंचवासारखा बिर्हाड आहे. प्रचंड मेहनतीने काम करत आपला संसार हाकत आहेत.