

कोप्रोली उरण : कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने पुनरिक्षणासाठी मंगळवारी (१४) उरण नगरपरिषदेने बोलाविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतही अल्पमतातील सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेत बहुमतात असलेल्या भाजपच्या १२ सदस्यांनी ३८ ठरावांवर नामंजूरीची मोहर उमटवली.यामुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी आयोजित सभा पुन्हा एकदा वांझोटीच ठरली.
उरण नगरपरिषदेच्या १८ मे २०२६ रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. आयोजित करण्यात आलेल्या या सभेत विविध विकास कामांचे ४४ विषय कार्यक्रमपत्रिकेवर ठेवण्यात आले होते.मात्र सभेचे कामकाज सुरू असतानाच ७ ठरावानंतर सत्ताधारी महाआघाडी विरोधात भाजपच्या १२ सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.वादविवादाने आणखीनच गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झाली होती.
यामुळे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांतील दोन सदस्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे फर्मान सोडले होते.मात्र नगराध्यक्षांच्या आदेशाचे विरोधी सदस्यांनी ना पालन केले ना सभागृह सोडले नाही.सभागृहातील विरोधकांची उपस्थिती डावलून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी ९ सदस्यांच्या जोरावर विकास कामांचे ४४ ठराव मंजूर केले होते.
याला भाजपच्या सदस्यांनी विरोध करून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दाद मागितली होती. मात्र याबाबत अधिकार नसल्याने सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार भाजपच्या सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.अशी माहिती उरण नगरपरिषद कार्यालयाकडून देण्यात आली.
कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर पुनरिक्षणासाठी मंगळवारी नगरपरिषदेने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखालीसर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती.मात्र कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बोलाविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपच्या १२ सदस्यांनी ३८ ठराव बहुमताच्या जोरावर नामंजूर केले.विरोधकांनी विरोधाची परंपरा कायम राखल्याने शहराच्या विविध विकास कामांसाठी आयोजित सर्व साधारणसभा पुन्हा एकदा वांझोटीच ठरली.
विभागीय कोकण आयुक्तांनी महिलांचे विविध प्रश्न व स्वच्छता, आरोग्य, स्वच्छतागृहासारख्या विषय नाकारु नयेत अशा सूचना केल्या होत्या.मात्र त्यानंतरही भाजप सदस्यांनी सदर विषय नामंजूर केले.
भावना घाणेकर, नगराध्यक्षा