

महाड : रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष सुरू असतानाच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथील एका कार्यक्रमादरम्यान नामदार आदिती तटकरे यांचा नामोल्लेख करताना 'जनतेच्या मनातील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री' असा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला. याबाबत नामदार भरत गोगावले यांना माध्यमांनी छेडले असता 'कोणी म्हणतो आम्ही मनातले तर आम्ही काय ध्यानातले आहोत काय!' अशी थेट प्रतिक्रिया देत ७५ टक्के जनतेच्या मनातील रायगडचे पालकमंत्री आपणच असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच नामदार अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपद नियुक्ती न झाल्याने रायगडचा विकास खोळंबला आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली आहे, असे विधानही अनिकेत तटकरे यांनी केले होते. या विधानाचा देखील गोगावले यांनी समाचार घेतला. पुढे बोलताना गोगावले म्हणाले, महायुती सरकारच्या काळात दोन ते अडीच वर्षात रेकॉर्डब्रेक विकास झाला आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. याबरोबरच पालकमंत्री पदाबाबत आम्ही देखील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली असून माध्यमांनी त्यांच्याशी याबाबत विचारणा करावी. ते जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. असेही ते यावेळी म्हणाले.
एकंदरीत रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास महायुतीला या निवडणुकांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता मात्र बळावली आहे.