Bharat Gogavale | रायगडचा पालकमंत्री मीच होणार, भरत गोगावलेंचा पुनश्च दावा
श्रीवर्धन : रायगडचा पालकमंत्री मीच होणार असा आत्मविश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे आणि लवकरच रायगडचा विषय देखील सुटेल. त्यानंतर पालक मंत्री म्हणून माझं नाव निश्चित होईल, असे सांगत त्यांनी राष्ष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्री गोगावले यांनी गुरुवारी श्रीवर्धनला भेट देत तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे शिवसेनेच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. गोगावले यांचा पहिल्यांदाच श्रीवर्धन येथील आगमन दौरा महत्वाचा ठरला त्यानिमित्ताने श्रीवर्धन शहरात उत्साहाचा माहोल होता. शहरभर भगवे पताका, रंगीबेरंगी फुलांची रंगोली आणि सजावट करून तयारी करण्यात आली होती. रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी सडा टाकण्यात आला आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
श्रीवर्धन शासकीय विश्रामगृहात एकत्र झालेल्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. या गर्दीत मंत्री गोगावले यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि आपल्या कार्यकाळात येथील विविध समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. माझ्या कार्यकाळात मी नेहमी कार्यकत्यांच्या पाठीशी रा हणार असून, त्यांच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करणार असल्याचे नमूद केले.
मंत्री गोगावले यांना पत्रकारांनी विविध मुद्यांवर प्रश्न विचारले. शिव सेनेचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघावर आपल्या मित्रपक्षाची सत्ता कशी प्रस्थापित केली जाईल? यावर त्यांनी प्रत्येक पक्ष आपल्या प्रभाव वाढवण्यासाठी काम करतो. आम्ही देखील आमच्या पक्षाची अधिक शक्ती कशी वाढवू शकतो यावर नियोजन करत असल्याचे सूचित केले.
पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता, गोगावले यांनी स्पष्ट केले, हा विषय सध्या अंतिम टप्प्यात आहे. नाशिकचा विषय पूर्ण झाला आहे आणि लवकरच रायगडचा विषय देखील सुटेल. त्यानंतर पालक मंत्री म्हणून माझं नाव निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला.
कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, उपतालुका प्रमुख ओमकार शेलार, युवासेना तालुका अध्यक्ष सागर इंगळे, शहरप्रमुख देवेंद्र भुसाणे, युवासेना शहराध्यक्ष अजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर मोठ्याप्रमाणात होते.
शासनाच्या माध्यमातून पर्यटनासह श्रीवर्धनच्या विकासासाठी आपण सातत्याने काम करत राहू. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जाईल. तसेच, कुठल्या पर्यटकाच्याबाबतीत काही वाईट घटना घडल्यास प्रशासन योग्य ते उपाययोजना करेल.
- ना. भरत गोगावले, रोहयो मंत्री

