

आनंद सकपाळ
नेरळ: कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या बेकरेवाडी या आदिवासी वाडीमध्ये यंदाही गणेशोत्सवाची पारंपरिक रंगत अनुभवायला मिळाली. अनेक वर्षांपासून जपली जाणारी विहिरीत गणेश विसर्जनाची अनोखी परंपरा ग्रामस्थांनी यंदाही श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाने कायम ठेवली.
लाडक्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप देताना संपूर्ण बेकरेवाडी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
बेकरेवाडीमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. उत्सवाच्या काळात घराघरांत गणरायाची भक्तिभावाने पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
गणेश विसर्जनाचा दिवस उजाडताच गावातील वातावरणात उत्साह संचारला. महिला, लहान मुले, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
बेकरेवाडीतील गणेश विसर्जनाची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण असून, गावातील पारंपरिक विहिरीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मिरवणुकीनंतर गणेशमूर्त्या या विहिरीजवळ आणल्यानंतर तरुणांनी विशेष काळजी घेत पारंपरिक पद्धतीने मूर्ती विहिरीतील पाण्यापर्यंत नेली.
कपड्याच्या सहाय्याने मूर्तीचा पाट सांभाळत, विहिरीतील पाण्यात उभ्या असलेल्या तरुणाच्या खांद्यावर दुसऱ्या तरुणाला बसवून गणेशमूर्ती पाण्यात नेण्यात आली. धार्मिक विधी पूर्ण करून त्यानंतर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
या पारंपरिक विसर्जन सोहळ्यात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. तरुणांचा उत्साह, महिलांचा भक्तिभाव आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यामुळे विसर्जन सोहळ्याला ग्रामीण संस्कृतीचा अनोखा साज
लाभला. माथेरानच्या डोंगररांगांच्या सान्निध्यात, गावच्या मातीशी घट्ट जोडलेली बेकरेवाडीतील ही साधी, पारंपरिक आणि अनोखी विसर्जन पद्धत ग्रामीण जीवनशैलीची तसेच आदिवासी सांस्कृतिक परंपरेची वेगळी ओळख अधोरेखित करणारी ठरली.
नव्या पिढीने जपला पूर्वजांचा वारसा...
बदलत्या काळानुसार अनेक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या पद्धतींमध्ये बदल होत असताना बेकरेवाडीतील तरुण पिढीने मात्र पूर्वजांकडून चालत आलेली ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिकतेचा स्वीकार करतानाच आपल्या गावच्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी असलेली नाळ कायम ठेवण्याचा संदेश या सोहळ्यातून पाहायला मिळाला.
तर गणेश विसर्जनाच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र आल्याने बेकरेवाडीतील सामाजिक एकोपा आणि सामूहिक बांधिलकीचेही दर्शन घडले. उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच गावची पारंपरिक संस्कृती, परस्परांचे सहकार्य आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा जपण्याची भावना अधोरेखित झाली.