

रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर शुक्रवारी (दि.११) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीची व्यवस्था म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या चार गाड्या किल्ले रायगडावर तयार ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा परिवहन विभागातील सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने किल्ले रायगडावर येणाऱ्या मान्यवरांच्या सोयीसाठी पूर्वी रायगडावर उपलब्ध असलेल्या दोन बॅटरीवर चालणाऱ्या सहा आसनी गाड्यांमध्ये अधिक दोन गाड्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले होते. त्यानुसार आणखी दोन गाड्या किल्ले रायगडावर पाठवण्यात आल्या आहेत. रायगडावरून जगदीश्वर मंदिराकडे मान्यवरांना जाण्यासाठी या गाड्यांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.