

अलिबाग : 1500 रुपये देऊन कोणतीही माय सुखी होऊ शकत नाही. राज्यकर्ते या गोरगरीब जनतेला मूर्ख बनवत असतात आणि आपल्याला त्यावरच प्रहार करायचा आहे. आमचे भले करणार असाल तरच आम्ही तुमची साथ देऊ, अशी भूमिका आपल्या कष्टकरी, मच्छितार, दिव्यांग बांधवांनी घेतली पाहिजे, असे उद्गार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येथे काढले.
अलिबाग शहरातील नागडोंगरी परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या पुढाकाराने पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्याचप्रमाणे हक्कयात्रेसाठी गुरुवारी (9 ऑक्टोबर) आमदार बच्चू कडू बोलत होते.
यावेळी ‘प्रहार’चे कोकण दिव्यांग बांधव प्रदेशाध्यक्ष सुरेश मोकल यांच्यासह मोठया संख्येने मच्छिमार, शेतकरी व दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी कोळी महिलांनी आपले पारंपरिक नृत्य सादर करून आमदार बच्चू कडू यांचे स्वागत केले.
आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की, गरीब कामगार, मच्छीमार, दिव्यांग बांधवांसाठी ही लढाई अजून कठोर करायची आहे. दिव्यांग बांधवांना आधी 600 रु. मिळायचे ते आम्ही लढा देऊन आता 2500 रु. मिळतात. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी असून ती बनविण्यात कामगार, मच्छीमार बांधवांचा मोठा वाटा आहे. मात्र या सत्ताधा-यांनी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करून मोठमोठ्या उद्योजकांचे भले केले.
त्यामुळे आता ही मुंबई उद्योगपतींची झाली आहे. मात्र ज्यांच्यासाठी कोणीच नाही त्यांच्यासाठीच आपण उभे राहायचे आहे. कष्टकरी, शेतकरी, मच्छिमार, दिव्यांग बांधवांच्या हक्कसाठी आपण लढायचे आहे. यासाठीच तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले.यानंतर जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनीदेखील सर्व गोरगरीब बांधवांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.
आता ही मुंबई उद्योगपतींची झाली आहे. मात्र ज्यांच्यासाठी कोणीच नाही त्यांच्यासाठीच आपण उभे राहायचे आहे. कष्टकरी, शेतकरी, मच्छिमार, दिव्यांग बांधवांच्या हक्कसाठी आपण लढायचे आहे. यासाठीच तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे.
आमदार बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक