रायगड ः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी समोर आली आहे, मात्र अर्जमाघारी अंतीच चित्र स्पष्ट होणार आहे. यामध्ये महाड व श्रीवर्धन मतदार संघात दुरंगी तर अलिबाग, कर्जतमध्ये चौरंगी लढत अपेक्षीत आहे. पेण ,पनवेल व उरणमध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. महाआघाडीमध्ये शेकापच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार उभे केल्याने बंडखोरीची शक्याता आहे तर कर्जतमध्ये महायूतीच्या उमेदवाराच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर रिंगणात उतरले आहेत. शिवसेना-ठाकरे आणि शेकाप यांच्यामध्ये तडजोड घडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत होत असून त्यात उमेदवारी बाबत अंतिम निर्णय होणे अपेक्षीत आहे.
कर्जत विधानसभा मतदार संघात शिवसेवा शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे, शिवसेना-ठाकरे गटाचे नितीन सावंत आणि भाजपाचे किरण ठाकरे रिंगणात आहेत. परिणामी महायूती आणि आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
पनवेलमध्ये महायूतीतील भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात महाआघाडीतील शेकापचे बाळाराम पाटील व शिवसेना-ठाकरे गटाच्या लिना गरड या रिंगणात आहेत. तर उरणमध्ये महायूतीतील भाजपाचे विद्यमान आमदार महेष बालदी यांच्या विरोध महाआघाडीतील शिवसेना-ठाकरे गटाचे मनोहर भोईर व शेकापचे प्रितम म्हात्रे हे रिंगणात आहेत. पेणमध्ये शिवसेना-शिंदे घटाचे विद्यमान आमदार महेेंद्र दळवी यांच्या विरोधात महाआघाडीतील शेकापच्या चित्रलेखा पाटील, शिवसेना-ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे आणि भाजपा बंडखोर उमेदवार दिलीप भोईर रिंगणात
पेण विधानसभा मतदार संघात महायूतीतील भाजपाचे विद्यमान आमदार रवीद्र पाटील यांच्या विरोधात महाआघाडीतील शेकापचे अतूल म्हात्रे आणि शिवसेना-ठाकरे गटाचे प्रसाद भोईर हे रिंगणात आहेत.
श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदार संघात मात्र दुरंगी लढती अपेक्षीत आहे. श्रीवर्धन मध्ये मंत्री तथा महायूतीतील राष्ट्रवादी
काँग्रेस-अजित पवार पक्षाच्याविद्यमान आमदार आदिती तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे अनिल नवगणे व काँग्रेसचे अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर रिंगणात आहेत. मात्र येथे लढत तटकरे व नवगणे यांच्यातच होणार आहे. महाड विधानसभा मतदार संघात महायूतीतील शिवसेना-शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले आणि शिवसेना-ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 74 उमेदवारांचे 93 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर अंतिमता एकुण 111 उमेदवारांचे 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अलिबाग व पनवेल या दोन विधानसभा मतदार संघात सर्वाधीक प्रत्येका 23 उमेदवार रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पनवेल विधानसभा मतदार संघात 16 उमेदवारांचे 21 अर्ज दाखल झाले तर या मतदार संघात एकूण 23 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघात आज अखेरच्या दिवशी 17 उमेदवारांचे 22 अर्ज दाखल झाले तर एकूण 23 उमेदवारांचे 28 अर्ज दाखल झाले आहेत. कर्जत विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी 07 उमेदवारांचे 07 अर्ज दाखल झाले तर एकूण 13 उमेदवारांचे 15 अर्ज दाखल झाले आहेत. उरण विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी 08 उमेदवारांचे 09 अर्ज दाखल झाले तर एकूण 16 उमेदवारांचे 17 अर्ज दाखल झाले आहेत. पेण विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी 11 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले तर एकूण 15 उमेदवारांचे 19 अर्ज दाखल झाले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले तर एकूण 13 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाले आहेत. तर महाड विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी 06 उमेदवारांचे 06 अर्ज दाखल झाले तर एकूण 8 उमेदवारांचे 11 अर्ज दाखल झाले आहेत.