

अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सातही मतदार संघात महायुती, महाआघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी (अलिबाग), महेंद्र थोरवे ( कर्जत ) हे उमेदवार कोट्यधीश असल्याचे शपथपत्रातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांच्या चल,अचल संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघातून दुसर्यांच्या निवडणूक लढविणारे शिवसेना ( शिंदे ) उमेदवार महेंद्र दळवी यांनी सादर केलेल्या विवरण पत्रातून त्यांनी मालमत्तेचा सविस्तर तपशील सादर केला आहे.यामध्ये त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 19 कोटी 37 लाख,24 हजार आहे.तर जंगम मालमत्ता 1कोटी 37 लाख 77,826 रुपयांची आहे.सन 2019 च्या आयकर विवरण पत्रात त्यांचे एकूण उत्पन्न 11 लाख97,860रुपये एवढे होते तर सन 2023 -24 च्या आयकर विवरण पत्रात त्यांचे एकूण उत्पन्न 51 लाख,10,860 असे दाखविले आहे. दळवी यांच्याकडे रोख 77,95,411 एवढी रोकड आहे.तर पत्नी मानसी दळवी यांच्याकडे 1 लाखाची रोकड आहे.डम्पर,जेसीबी,पोकलेन, महेंद्र थार, रेंज रोव्हर अशी वाहने आहेत.चार लाखांचे सोने तर पत्नीकडे 12 लाखांचे सोन्याचे दागिने आहेत. स्वसंरक्षणासाठी एक परवानाधारक पिस्तूलही आहे. थळ, तुडाल,वायशेत आदी ठिकाणी शेत जमिनी, स्थावर मालमत्ताही दाखविली आहे. पत्नी मानसी यांच्या नावे सारस्वत बँकेचे 12 लाख,32 हजारांचे कर्ज आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात मारामारी,जमाव जमा करणे,धमकी देणे असे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.अन्य एका गुन्ह्यात झालेल्या शिक्षेला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानही दिलेले आहे.
महाड विधानसभा मतदार संघातून प्रथमच शिवसेना (ठाकरे)तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महाड़च्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत या सुद्धा लखपती उमेदवार आहेत.यामध्ये त्यांनी आपली स्थावर,जंगम मालमत्तेचे विवरण सादर केलेले आहे. सन 2019 मधील त्यांचे आयकर उत्पन्न 5 लाख 7,518 रुपये होते.तेच उत्पन्न सन 2023 -24 मध्ये 3 लाख 65,570 रुपये दाखविले आहे. पती स्वानंद कामत यांचही उत्पन्न तेवढेत दाखविले गेले आहे. विविध बँकांमधील गुंतवणूक त्यांनी तीन लाखांच्या आसपास दाखविली आहे.तर मुलगी अधिरा हिच्या नावे त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेत 1लाखांची गुंतवणूक केलेली आहे. टोयाटो ,इन्होवा या दोन गाड्याही कामत परिवाराच्या नावे आहेत. य चांभारखिंड येथे एक प्लॉट आहे.तर महाडमध्ये एक फ्लॅट त्यांच्या नावे आहे. साडे बत्तीस लाखांचे 300 ग्रॅम सोने आहे.
कर्जत विधानसभा मतदार संघातून दुसर्यांचा निवडणूक लढविणार्या शिवसेनेच्या महेेंद्र थोरवे यांच्या चल,अचल संपत्तीत गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झालेली आहे.थोरवे दाम्पत्याची स्थावर मालमत्ता 50 कोटींच्या आसपास झालेली आहे. सन 2019 मध्ये सादर केलेल्या आयकर विविरण पत्रातून त्यांनी साडेसतरा लाखांचे उत्पन्न दाखविले होते.तर 2023 -24च्या आयकर विवरण पत्रात त्यांचे उत्पन्न 77 लाखांच्या घरात गेलेले आहे.
थोरवे यांच्याकडे आजमितीस 1 लाख रोख रक्कम आहे.तर विविध बँकांमधील 18 लाखांची गुंतवणूक आहे. एलआयसीमधील गुंतवणूक 38 लाखांच्या आसपास आहे.फॉर्च्यून, जीप, फोर्ड मस्टँग आदी वाहनेही त्यांच्याकडे आहेत.त्यांच्याकडे 4 लाखांचे सोन्याचे दागिने तर पत्नी मीना थोरवे यांच्याकडे 9 लाखांचे सोन्याचे दागिने आहेत.
स्वरक्षणासाठी परवानाधारक एक पिस्तूलही आहे.कर्जत तालुक्यातील पोसरी,भालवली ताकवली आदी ठिकाणी शेतीही आहे. थोरवे यांनी सर्वोदय बँक,अॅक्सीस बँक,एसबीआयमधून 75 लाखांचे कर्जही घेतलेले आहे.