

पुढारी ऑनलाईन डेस्क : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्यांकाडप्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी आता २१ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आजच्या (दि.११) सुनावणीत न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती, मुलगी, वडील, भाऊ यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तसेच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांचेही म्हणणे एकूण घेण्यात आले.
तत्पूर्वी ५ एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी या हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरसह दोन साथीदारांना दोषी ठरविले होते. कुरुंदकरसह अश्विनीच्या हत्याप्रकरणी साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकरला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. आज (दि.११) अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेच्या सुनावणी झाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे अपहरण, हत्या, शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप अभय कुरुंदकर याच्यावर न्यायालयात सिद्ध झाला. साथीदार कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले होते. आज पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बाजू मांडली. यावेळी अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धी गोरे, पती राजू गोरे, वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे न्यायालयात उपस्थित होते.