Shri Sheetaladevi temple : अष्टागरातील चौलचे जागृत देवस्थान श्री शीतलादेवी

देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व; 1658 मध्ये झालेला मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार
Shri Sheetaladevi temple
अष्टागरातील चौलचे जागृत देवस्थान श्री शीतलादेवीpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

निसर्गाने भरभरून दिलेल्या चौल चंपावती नगरीतील श्री शीतळादेवी हे अतिशय जागृत देवस्थान असून तिच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. नवरात्रौत्सवात तर येथे 9 दिवस भक्तीचा मळा फुलतो.

अलिबागपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेले चौल हे मंदिरांचे गाव म्हणून ओळखले जाते. चौल गावात जी अनेक मंदिर आहेत, त्यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते श्रीशीतलादेवीचे मंदिर. प्राचीन काळात चौल हे चंपावती नगरी म्हणून ओळखले जायचे. समुद्राच्या तीरावर असलेल्या या गावाला समुद्राचा खूप त्रास होत असे. समुद्र गावाची जमीन गिळंकृत करू लागला तेव्हा चंपावती राणीने शीतळादेवीची प्रार्थना करून हे संकट दूर करण्यासाठी साकडे घातले. देवीने ही प्रार्थना ऐकली आणि तिथे आपल्याकडील अस्त्राने बांध घातला व संकट दूर झाले. तेव्हा राणीने देवीचे मंदिर बांधले अशी या मंदिराची अख्यायिका सांगितली जाते.

या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार इसवी सन 1658 मध्ये बाबूभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे. 1785 मध्ये राघोजी आंग्रे हे कुटूंबासह देवीच्या दर्शनास आले होते. तर 1792 मध्ये मुलाबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले होते. त्याप्रसंगी हत्ती, घोडे, सरंजाम व काही लष्कर बरेच दिवस तळ ठोकून या ठिकाणी राहिले होते.

1805 मध्ये बाबूराव आंग्रे दर्शनाला आल्याचा उल्लेख असून दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी आंग्रे कुटूंब दर्शनाला न चुकता येई व देवीच्या रक्षकाचा मान देत असत. पूर्वीचे आंग्रेकालीन लाकडी कौलारू मंदिर पाडून त्या वास्तुतील मूर्तीची जागा न बदलता ग्रामस्थांनी जीर्णोध्दार समिती नेमून 27 मार्च 1990 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुर्हूतावर नवीन वास्तू बांधण्यास सुरूवात केली. मार्च 1997 मध्ये हे काम पूर्ण झाले.

मंदिराला पूर्वाभिमुख दरवाजाबरोबरच उत्तर व दक्षिण बाजूसही प्रवेशव्दार आहे. गाभार्यात देवीची तेजस्वी मूर्ती असून त्यामागे नागराजाची प्रभावळ आहे. गाभार्‍यावरील उंच कळसाबरोबरच सभामंडपावरही कळस आहे. मंदिरात आधुनिक असले तरी सुंदर कोरीव काम पहायला मिळते. मंदिरात दररोज भाविकांची रेलचेल असते.

नवरात्रौत्सवात तर खूप गर्दी असते. नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चौल नगरीचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व दिवसागणिक वाढते आहे. कोकण किनारपट्टीवर फेरफटका मारताना चौलच्या शतळादेवीचे दर्शन घ्यायला पर्यटक विसरत नाहीत.

Shri Sheetaladevi temple
Raigad Jal Jeevan Mission : 50 हजार कुटुंब नळजोडणीपासून वंचित

अलिबाग तालुक्यातील शीतळादेवी हे धार्मिक स्थळ अलिबाग शहरातपासून सुमारे पंधरा किमी अंतरावर आहे. राज्यभरातील भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अलिबागपासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागते. खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे भाविकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

राज्याबाहेरही देवस्थानाची महती

चौलच्या शीतलादेवीची महती सर्वदूर पसरली आहे. ही देवता महाराष्ट्रातील नव्हे तर अन्य प्रांतातील अनेक कुटूंबांची कुलदैवत आहे. मंगळवार, शुक्रवारी केवळ रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक देवीच्या दर्शनाला आवर्जून येत असतात. रोजच्या जगण्यात भेडसावणार्‍या समस्यांबरोबर मोठमोठ्या संकटांची गार्‍हाणी भाविक देवीसमोर मांडतात. आपल्या इच्छापूर्तीसाठी देवीला कौलही लावला जातो. देवीच्या दर्शनाने मन तृप्त होते, असे भाविक आवर्जून सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news