

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवरायांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेऊ नका. तर छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत. राज माता जिजाऊंना माझा प्रणाम. त्यांनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वातंत्र्यांचा विचार दिला. त्यामुळेच शिवरायांनी महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
आपल्या सुमारे पंधरा मिनिटांच्या भाषणामध्ये अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्याचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली स्वधर्माची लढाई थांबता कामा नये. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होते, तिथे मी शिवरायांना अभिवादन केले. स्वराज्य, स्वधर्म यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहेत. मात्र, असे साहस मी एकाही राजामध्ये पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत.
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावर लोटलं पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. छत्रपती शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात अडकले आहे. मात्र, आम्ही लढून ते स्मारक मोकळे करुन घेऊ आणि ते स्मारक व्हावे, हा प्रयत्न आमचा असेल, असेही ते म्हणाले. अमित शहा आज गृहमंत्री म्हणून नाही तर मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवरायांनी १८ पगड जातींना एकत्र करत मावळ्यांना वीरांमध्ये परिवर्तीत करत स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे, यासाठी अमित शहांना विनंती आहे. महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. छत्रपतींच्या आशीर्वादाने चालणारे हे सरकार आहे. संविधान आणि छत्रपतींच्या विचारावर चालणारे आमचे सरकार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपले अस्तित्व टिकून असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवाजी महाराज आरमाराचे जनक होते. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी आज इतिहास सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. रशिया, कुपवाडात पुतळा उभा राहिला. वाघनखेदेखील आपण आणली आहेत. छत्रपतींनी हातात तलवार घेतली. मात्र, ती सामान्यांच्या हितासाठी वापरली. छत्रपतींवर चाल करुन आलेल्यांची थडगी इथेच गाडली गेली, हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शानेच आपले सरकार काम करत आहे. आपल्या इतिहासाचे जतन झाले पाहिजे आणि ते अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे. गडकोट किल्ले आपला इतिहास आहे. एएसआयनेदेखील सहकार्य केले पाहिजे, हीच अमित शहांना विनंती आहे, असे शिंदे म्हणाले.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण व्हावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून छत्रपतींच्या कुटुंबीयांबद्दल केली जाणारी वक्तव्य ही दुर्दैवी असून अशा महापुरुषांबाबत शासनाने स्वतंत्रपणे कायदा तयार करावा. दहा वर्षांपर्यंत जामीन भेटणार नाही, अशी तरतूद करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चालू वर्षाचा 'श्री शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार' दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला. सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंग जी होळकर यांना विशेष सत्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनाही त्यांच्या विशेष कार्याबद्दल उपस्थितांकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते "शिवरायमुद्रा" स्मरणिकेचे प्रकाशन व गडारोहण स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले.