

Alibaug's underground sewerage scheme
अलिबाग : सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील भुयारी गटार योजनेला मुहूर्त केव्हा मिळणार, असा सवाल शहरातील नागरीक विचारत आहेत. काही वर्षांपूर्वी वार-गळलेल्या या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पाला पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्याला शासनाकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याने हे काम बारगळले आहे. मात्र यामुळे अलिबागकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
समुद्राच्या किनारी असलेल्या अलिबाग शहराची भौगोलिक रचना प्रकल्पाच्या आड येत असल्याचे बोलले जात होते. काही वर्षांपूर्वी शहरात मोठा गाजावाजा करीत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले परंतु वेगवेगळ्या कारणाने हे काम बारगळले आणि ठप्पच झाले. महेंद्र दळवी अलिबागचे आमदार झाल्यानंतर त्यानी ही योजना पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला.
अलिबाग शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची समस्या सोडविण्यासाठी भुयारी गटार लाईन टाकली जाणार आहे. शासनाच्या नगरोत्थान महा अभियान अंतर्गत नव्याने भुयारी गटार व मलः निस्सारण एसटीपी प्लांट योजनेचा कामाचा शुभारंभ नोव्हेंबर २०२४ मध्ये करण्यात आला. या प्रकल्पासाठी ६१ कोटी ३४ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. मात्र शासनाकडून या कामासाठी येणारा निधी अपुरा आलेला असल्याने शुभारंभ होऊनही अद्यापही भुयारी गटार लाईनचे काम प्रत्यक्षात अद्यापही सुरू झालेले नाही आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न जैसे थे राहिलेला आहे.
अलिबाग शहर हे समुद्र सपाटीपासून खाली असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण येते. काही वर्षांपूर्वी भुयारी गटाराचे काम शहरात सुरू झाले होते. मात्र वेगवेगळ्या कारणाने हे काम बंद पडले. त्यावेळी या कामावर झालेला एक कोटी रुपये खर्च वाया गेला होता. आता शासनाने नव्याने नगरोत्थान महाअभियान अंतर्गत योजनेला मंजुरी दिली आहे. एचडीडी या अत्याधुनिक पद्धतीने या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे.
नाशिक येथील एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. अलिबाग शहराला ऐतिहासिक वारसा आहे. तसेच शहराला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांचा राबताही मोठा असतो. शहरात सांडपाणी, मलः निस्सारण निचरा याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने अस्वच्छता होते. आजही शहरातील गटारे उघडी आहेत. पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावी लागते. वाढत्या रहदारीमुळे शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण झाल्याने गटारांची अवस्था वाईट झाली आहे. शहर समुद्र सपाटीपासून खाली असल्याने सांडपाणी व्यवस्थापन करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
नगरपरिषदेतर्फे भुयारी गटार व मलः निस्सारण एसटीपी प्लांट प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची तांत्रिक मान्यता प्राप्त मिळाली होती. शासनाने नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६१ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या योजनेच्या कामाचा नारळ वाढवला होता. त्यामुळे आता तरी भुयारी गटाराचे काम मार्गी लागेल, अशी आशा अलिबागकरांना होती. मात्र निधीअभावी अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही.