

अलिबाग : उन्हाच्या झळा अजून सुरू व्हायच्या आहेत... विहिरी, बोअरवेलने अजून तळ गाठायचा आहे... खरी पाणी टंचाई तर अजून अनुभवाची आहे... त्याची रंगीत तालीम मात्र जानेवारीपासूनच सुरू झाली आहे.
योजना एकतर कागदावर पूर्ण होतात किंवा प्रत्यक्षात अर्धवट राबविल्या जातात. परिणामी गावकरी विकतच्या पाण्यावर तहान भागवितो. अलिबाग तालुक्यातील नवखार उर्फ डावली रांजणखार हे गाव. अगदी समुद्रकिनारी वसले आहे. आज या गावातील लोक विकतच्या पाण्यावर तहान भागवीत आहेत. पाणी नियमित मिळत नसल्याने येत्या ३ मार्च रोजी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
नवखार गावचा पाणी प्रश्न हा गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. टाकी आहे, जलवाहिनी देखील आहे. त्याला पाणी नाही. तोडगा म्हणून नवीन जलजीवन योजना राबविण्यात आली. त्या योजनेचे काम मुदत उलटून गेली तरी पूर्ण झाले नाही. मागील महिनाभर गावात योजनेचे पाणी पोहचले नाही. गावकरी विकतचे पाणी घेऊन तहान भागवीत आहेत. गावकऱ्यांनी या पूर्वी देखील पाण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात पाणी पोहचत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी येत्या ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश, हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तसे निवेदन दिले असल्याची माहिती माजी सरपंच हेमंत पाटील यांनी दिली.
गावकऱ्यांनी येत्या ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश, हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तसे निवेदन दिले असल्याची माहिती माजी सरपंच हेमंत पाटील यांनी दिली.