

अलिबाग : अलिबाग-वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. विकासाची गोडगोड आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तात्पुरती डागडुजी करून नागरिकांच्या डोळयात धूळफेक करण्याचे काम मात्र प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. अलिबागमधील अनेक नागरिक हे गणरायाची मूर्ती पेणमधून आणतात. मात्र अशा खड्डेमय रस्त्यातून गणरायाला घरी आणायाचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूकही धीम्या गतीने होत आहे.
अलिबाग-पेण मार्गाच्या चैपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता. प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो गुंडाळण्यात आला. रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहनचालकांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे, हेच शासनाला माहिती नाही. सर्वच विभाग याबाबत टोलवाटोलवी करत आले आहेत.
या रस्त्याचे चैपदरीकरण दूरच राहिले, किमान रस्त्याची डागडुजी तरी करा, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन अलिबाग-पेण मार्गाची डागडुजी व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल. सामान्य जनतेची मानसिक स्थिती बदलून त्याच्याकडून काहीतरी अघटीत घडण्याआधी किमान या रस्त्याची डागडुजी होईल, अशी अपेक्षा स्थानिकांसह प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
अलिबागमधील पोयनाड, कार्लेखिंड, तळवली, वाडगाव, गोंधळपाडा, पिंपळभाट, बायपास रोड येथे तर 1 ते दीड फूटांचे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी हे खड्डे सामाजिक संस्था व स्थानिक तरूणांनी एकत्र येत खडी व मातीच्या सहाय्याने बुजविले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जागे होत या खड्डयांमध्ये भर पावसात बारीक खडी टाकली होती. मात्र ही तात्पुरती डागडुजी त्यानंतर पडलेल्या 4 दिवसांच्या मुसळधार पावसात वाहून गेली. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.