

रायगड : अलिबाग एसटी बस आगारातील स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी बसेस वेळेवर न लागणे, फलाटाजवळी कठडे तुटणे असा प्रकार घडला आहे. सुविधांच्या अभावाचा फटका प्रवाशांना बसत आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पर्यटनाबरोबरच नोकरी व्यवसायानिमित्त अलिबागला येणार्यांची संख्या खुप मोठी आहे. वेगवेगळ्या गावांबरोबरच तालुका, जिल्ह्यातून प्रवासी अलिबागला ये-जा करतात. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करण्यावर अधिक भर दिला जातो. एसटीमध्ये प्रवासी वाढावे, म्हणून एसटी महामडंळाकडून वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व नियमीत प्रवास करणार्या प्रवाशांना या सवलतींचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. अलिबाग आगारात एकूण 76 एसटी बसेस आहेत. त्यामध्ये 17 शिवशाही, सीएनजीवर चालणार्या बस 49, आणि साध्या बसेस अकरा आहेत. प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहचता यावे, म्हणून विना थांबा अलिबाग-पनवेल बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, बसेस वेळेवर लागत नसल्याच्य तक्रारी वाढू लागल्या आहेत.
डिझेलच्या जागी सीएनजीवर चालणार्या बस सुरू करूनही वेळेवर बस लागत नसल्याचे बोलले जात आहे. सीएनजी भरण्यासाठी विलंब लागत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास आगार व्यवस्थापन उदासीन असल्याने खड्डयांचे साम्राज्य वाढले आहे. तसेच स्थानकातील फलाटाजवळील कठडा तुटून अनेक दिवस उलटून गेले आहेत. मात्र त्याची डागडूजी अजूनपर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. स्थानकाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग बस स्थानकासह रेवदंडा बस स्थानकातील खड्डयांमुळे वाहनांचा बिघाड होण्याबरोबर प्रवाशांनादेखील त्रास होत आहे. मोठ-मोठे खड्डे स्थानकाच्या परिसरात पडले आहेत. या खड्डयांमुळे बस आदळत आहे. बसच्या स्प्रिंग व टायरचे नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे असे, पत्र अलिबाग एसटी बस आगारातून पेणमधील रामवाडी येथील विभागीय अभियंतांना पाठविण्यात आले आहे. पत्र पाठवून एक ते दोन महिने होत आली आहेत. मात्र विभागीय अभियंत्याकडून या पत्राची दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, स्थानकाचे नुतनी करणाचे काम गेली अनेक वर्षापासून रखडलेले आहे.
अलिबाग स्थानकामधून भरपूर प्रवासी ये -जा करतात. खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. अलिबाग स्थानकातील व रेवदंडा बस स्थानकातील खड्डे लवकरात लवकरत भरण्यात यावे अशी मागणी विभागीय अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
राकेश देवरे, आगार व्यवस्थापक, अलिबाग