

रायगड : अलिबाग येथील शिवानी साईकर - वझे हिला ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर २०२५ मिडवेस्ट यूएस’ आणि ‘फिल विर्डझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स २०२५’ हे अमेरिकेतील दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
मूलकण संशोधनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील फर्मी नॅशनल अॅक्सेलरेटर लॅबोरेटरी (फर्मिलॅब) मध्ये शिवानी ऊर्जा व्यवस्थापक पदी कार्यरत आहे.
अलिबागजवळील थळगावचे रहिवासी साईकर दांपत्याची मुलगी शिवानीने आरसीएफ शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी आणि नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी (अमेरिका) मधून ऊर्जा विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) प्राप्त केली. डेनवरमधील एका खासगी कंपनीत काही काळ उमेदवारी केल्यानंतर तिची निवड शिकागो येथील फर्मिलॅबच्या ऊर्जा विभागात व्यवस्थापक पदासाठी झाली. दरम्यान, बॉस्टनमध्ये असताना अलिबागच्या मैत्रेय वझे याच्याशी मैत्री होऊन ती त्याच्याशी अमेरिकेतच विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे अलिबागमधील सुविख्यात डॉक्टर दाम्पत्य डॉ. रीटा आणि डॉ. राजीव धामणकर यांनी अमेरिकेत झालेल्या या विवाहसोहळ्याचे पौरोहित्य अलिबागमधून दूरस्थ पद्धतीने केले होते.
फर्मिलॅबमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेतील सुधारणा आणि विविध शाश्वत उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या तिच्या प्रयत्नांची दखल घेत, असोशिएशन ऑफ एनर्जी इंजिनियर्स तर्फे तिला ‘एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर 2025 मिडवेस्ट यूएस’ हा मानाचा पुरस्कार 17 सप्टेंबर रोजी जॉर्जिया वर्ल्ड काँग्रेस सेंटर, अटलांटा येथे प्रदान करण्यात आला. याशिवाय, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लॅबोरेटरीज तर्फे ‘फिल विर्डझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स 2025’ हा प्रतिष्ठित पुरस्कारही तिला जाहीर झाला आहे. तसेच ऊर्जा संवर्धनावरील तिचा संशोधन लेख ऊर्जाविषयक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह व्हीजेटीआय आणि आरसीएफ शाळेला देताना, शिवानी अलिबागमधील दादा वारीसे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते.