

रायगड | रायगडचे जिल्हा मुख्यालय असणारे अलिबाग हे कोकण रेल्वेच्या मुख्य रेल्वेमार्गाला पेण रेल्वेस्टेशनला जोडण्याची योजना गेल्या अनेक वर्षापासून रखडली आहे. खरं तर यापूर्वीच ही योजना पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र आता अलिबागच्या प्रवासी रेल्वेचे स्वप्न वास्तवात उतरवणार असून त्याकरिता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत जानेवारी महिन्यात उच्चस्तरीय बैठकी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास रायगडचे खासदार तथा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू स्थायी समीती अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी दैनिक पुढारीच्या जनतेचा जाहिरनामा सदरात प्रसिद्ध झालेल्या अलिबागच्या प्रवासी रेल्वेचे दिवास्वप्नच या विशेष वृत्ताच्या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना हा विश्वास व्यक्त केला.
प्रमुख रेल्वेमार्गाला जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण जोडण्याचा केेंद्र सरकारकारचा महत्वपूर्ण निर्णय आहे. मात्र त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता अपेक्षीत प्रयत्न यापूर्वीच्या काळात झाले नसल्याने, ही योजना आजतागायत कागदावरच राहीली आहे. अलिबागपर्यंत प्रवासी रेल्वे पोहोचल्यास या संपुर्ण परिसराचा संपूर्ण कायापालट होऊन, दररोज मुंबईस जाणार्यायेणार्यांकरिता त्याचा मोठा फायदा होणार आहे.
त्याच बरोबर येथील पर्यटन व्यव्यसायास देखील मोठी चालना मिळू शकणार आहे. परिणामी ही प्रवासी रेल्वेसेवा सुरु होणे अत्यावश्यक असल्याचे खा.तटकरे यांनी पूढे बोलताना सांगीतले. पेण रेल्वेस्टेशन पासून आरसीएफ थळ प्रकल्पाकरिता आरसीएफचा रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्यावरुन सद्यस्थितीत केवळ मालगाड्यांची वाहतूक होते. या रेल्वेमार्गावरुन प्रवासी रेल्वेसेवा सुरु करण्याकरिता आरसीएफ कंपनीने नाहरक दाखला अपेक्षीत आहे. त्याकरिता माजी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या बरोबर झालेल्या एका बैठकीत आरसीएफच्या अध्यक्षां बरोबर झालेल्या चर्चा केली होती, असेही खा.तटकरे यांनी सांगीतले. अलिबाग-वडखळ राज्यमार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याकरिता राज्याच्या सार्वजनिक बांधकांम खात्याने हा राज्यमार्ग , राष्ट्रीय महामार्ग विभागाला हस्तांतरित केला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा मार्ग पून्हा राज्याच्या सार्वजनिक बांधकांम खात्याकडे दिला आहे. परिणामी नेमका हा महामार्ग कोणी करायचा असा प्रश्न असल्याने राज्याचे सावर्जनीक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग विभाग व विरार-अलिबाग कॉरीडॉरचे वरिष्ठ अधिकारी यांची संयूक्त बैठक जानेवारीमध्ये घेऊन ,या कामा बाबत यंत्रणा निश्चित करुन कामाला गती देण्यात येईल असे खा.तटकरे यांनी अखेरीस सांगीतले.
अलिबागच्या प्रवासी रेल्वेमार्गा प्रमाणेच अलिबाग जिल्हा मुख्यालय हे गोवा राष्ट्रीय महामार्गाला वडखळ येथे महामार्ग करुन जोडण्याची योजना देखील रखडली आहे. परिणामी दररोज वाहतूक कोडींला सामोरे जावे लागत आहे. हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. आता या महामार्गाच्या कामाची जबाबदारी निश्चित करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देखील खा. तटकरे यांनी यावेळी दिले.