

अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या काळात व दिवाळीच्या ऐन सणात अलिबाग शहराच्या जवळ गोंधळपाडा येथील अंतर्गत रस्त्यावर 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. या नोटा मार्गावरुन येणार्या, जाणार्या वाहनचालक,वाटसरुनी उचलून नेल्याची जोरदार चर्चा आहे. पोलिसात मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत प्रत्यक्षदर्शी सोगावकर यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, बुधवारी(30 ऑक्टोबर) रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ते गोधळपाडा येथील अंतर्गत रस्त्याने बुरुमखाणकडे जात असताना भररस्त्यात होमगार्डच्या पुढील वळणावर वाहनचालक व इतर चालत जाणार्यांची गर्दी जमली होती. यावेळी एखादा अपघात झाला असेल म्हणून ते थांबले चौकशी केली असता एका आरसीएफ कामगार असलेल्या दुचाकी स्वाराने सांगितले की, अज्ञात व्यक्तीच्या 500 रुपयांच्या नोटा पडल्या आहेत, असे सांगत नोटा गोळा करत होता. अशी माहिती सोगावकर यांनी दिली. यावेळी एक युवतीही तेथे आली. ती कर्जत येथील एक्साईज विभागाची कॉन्स्टेबल आहे. ती थांबून राहिली. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर माहिती अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना संपर्क साधून दिली. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी त्वरित घटनास्थळी बिट मार्शल पाटील यांना पाचारण केले असता त्यांना 2500 रुपयांच्या 5 नोटा सुपूर्द केल्या. या नोटा कोणाच्या व किती आहेत व त्या कोणाकोणाला मिळाल्या आहेत याचा तपास अलिबाग पोलीस करत आहेत.
500 रुपयांच्या नोटा गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले. या संदर्भात साळे यांच्याकडे विचारणा केली असता,अशा मोठ्या प्रमाणात नोटा पडल्याची अथवा हरविल्याची कुठलीही तक्रार पोलिसांकडे नोंद झालेली नाही.पोलिसांनीही घटनास्थळी चौकशी केली आहे.पण तसे कुणीही काहीही ठोस सांगितलेले नाही,असे ते म्हणाले.