

रायगड ः जयंत धुळप
दर्याशी सातत्याने झुज देत आपले आयूष्य जगणार्या कोळी बांधवात मोठी कल्पकता असते. त्याचे कारण म्हणजे भर समुद्रात मच्छिमारीकरण्याकरिता गेल्यावर येणार्या समस्येवर तत्काळ मार्ग काढावा लागतो, अन्यथा गाठ जीवाशीच असते. परिणामी त्यांच्याकडे समस्यावर मात करण्याकरिताची कल्पकता जात्याच असते. आणि याच त्यांच्या कल्पकतेतून संणाच्या निमीत्ताने उपलब्ध साधन सामुग्रीतून एक करमणूकीचे साधन निर्माण करण्याच्या हेतूने सुमारे 60 वर्षांपूर्वी ग्रीस लावलेल्या मल्लखांबाच्या दहिहंडीचा जन्म झाला.
पूर्वी शिडाच्या बलबताचा वापर मच्छिमारीकरिता करण्यात येत असे, आणि या शिडाच्या उभारणी साठी गलबतावर मलखांबा सारखाच आणि त्याच उंची लाकडी खांब वापरला जात असे. या खालांला कापडी शिड खेचून फडकावण्याकरिता लोखंडी कप्पीवरुन दोरखंड वापरला जात असे. या लोखंडी कप्प्या सुरळीत गोल फिराव्यात या करिता त्यांना वंगण म्हणून ग्रीसचा वापर करण्यात येत असे. अशा या शिडाचा खांब आणि ग्रीसच्या दैनंदिन वापरातूनच ग्रीसच्या मलखांबाच्या हंडीची कल्पना आमच्या पूर्वजांना सूचली असावी अशी पूर्वपिठीका दशरथ नाखवा यांनी सांगीतली.
गोपाळकाल्याच्या दिवशी अलिबाग कोळावाड्यातील मच्छिमार सोसायटीच्या शेजारील पटांगणात ही ग्रीसच्या मलखांबाची दहिहंडी उभारण्यात येते. या मलखांबाला प्रथम संपूर्ण ग्रीस लावण्यात येते. मग त्याच्या वरच्या टोकाला दहीहंडी बोधण्यात येते. दोरांच्या आधाराने दहिहंडी बांधलेला हा मल्लखांब उभारण्यात येतो. मग ही दहिहंडी फोडण्याकरिता येणार्या गोविंदांना क्रमांक दिले जातात. प्रत्येक गोविंदा या मलखांबाला लावलेले ग्रीस काढून टाकत वर हंडीकडे चढत जाण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा तो या ग्रीसवरुन घसरत खाली येतो.
सुमारे 70 ते 80 गोविंदा ही हंडी फोडण्याकरिता आलेले असतात, त्यांना रोटेशन प्रमाणे हंडी फोडण्यासाठी मलखांबावर चढण्याची संधी देण्यात येते. या सुमारे 70 ते 80 गोविंदांच्या प्रयत्नांच्या किमान पाच फेर्या झाल्यावर मलखांबाचे ग्रीस मोठ्या प्रमाणात कमी होते. आणि अखेरचा टप्पा अत्यंत चूरशीचा होत गोविंदा अखेर हंडी फोडतो आणि मोठा आनंदोत्सव साजरा करत त्यांला मोठ्या रकमेचे पारितोषिक कोळी समाज मंडळाकडून देण्यात येते. दुपारी सुमारे तीन वाजता सुरु होणारी ही ग्रीसची मलखांब हंडी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फोडली जाते.
राज्यातील एकमेव दहिहंडी
राज्यातील एकमेव अशी ही ग्रीसची मलखांब हंडी पाहाण्याकरिता , नव्हे एन्जोय करण्याकरिता अलिबाग पंचक्रोशीतील आणि काही जिल्ह्या बाहेरील शौकीन दरवर्षी आवर्जून उपस्थित राहात असतात. यंदाही ही मलखांब दहीहंडी शनिवार 16 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता परंपरेप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे.