

रायगड ः अलिबाग तालुक्यातील नागाव येथे मंगळवारी आढळून आलेल्या बिबट्याला दुसऱ्या दिवशीही पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे हा बिबट्या याच परिसरात आहे अथवा तो त्याच्या अधिवासात गेला, याबाबत निश्चित खात्री देता येत नसल्याने नागाव परिसरात शोध मोहीम सुरुच राहिल, अशी माहिती अलिबाग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर नागावच्या घटनेनंतर बिबट्याच्या बचाव कार्यातील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती अलिबाग उपवन संरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील वाळंज पारोडा खालच्या आळीत भर वस्तीत नारळाच्या वाडीत मंगळवारी (9 डिसेंबर) सकाळी बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये अमीत वर्तक गंभीर व प्रसाद सुतार जखमी झाले. त्यानंतर झालेल्या बचाव कार्यातही काहीजण जखमी झाले. पुणे आणि रोहा येथील बचाव पथक यात सहभागी झाले. मंगळवारी दिवसभर हे बचावकार्य राबविण्यात आले. वन विभागाच्या रेस्क्यू टिमला संध्याकाळी डार्ट इंजेक्शन गन तंत्रज्ञानाचा वापर करुन, प्रेशनगनने गुंगीचे इंजेक्शन बिबट्याला मारण्यात आले आहे.
त्याचबरोबर थर्मल ड्रोणच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. रात्री उशिरपर्यंत ही बचार कार्य सुरु होते, मात्र बिबट्याचा सुगावा लागला नाही. दुसऱ्या दिवशीही नागाव परिसरात वनविभागाने बिबट्याची शोध मोहीम सुरु होती, मात्र सायंकाळीपर्यंत बिबट्या सापडून आला नाही, अथवा तो या परिसरातून दुसरीकडे गेला याबाबत वनविभाग निश्चित नसल्याने बिबट्याचे शोध कार्य सुरु राहिली, अशी माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
याबाबत अलिबाग उपवन संरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बिबट्याच्या बचाव कार्याबाबत माहिती दिली. अलिबाग वनविभाग क्षेत्रातील नागरी वस्तीत बिबट्या येण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे मंगळवारी नागाव येथील बिबट्याच्या बचाव कार्यात काही उणिवा दिसून आल्या आहेत. अलिबाग वनविभागाकडे डार्ट इंजेक्शन गन नाही. या गनसाठी प्रयत्न करण्यात येतील. बिबट्या आढळून आल्यानंतर नागरिक तेथे गर्दी करतात. यामुळे बिबट्या आणखी आक्रमक होतो. यासाठी नागरिकांचे प्रबोधन आवश्यक असून याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे पाटील यांनी सांगितले.
अलिबाग वनविभाग, पुणे आणि रोहा येथील सर्च टीम आणि पोलीस विभागाच्या मदतीने मंगळवारी व बुधवारी दुपारपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या दिसून आला नाही. मात्र तरीही शोध मोही सुरु आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून बिबट्या पुन्हा दिसून आल्यास वनविभागाला तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अलिबाग वनविभागाचे परिक्षेत्राचे अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
वनविभागाचे अपयश?
नागाव येथे आलेल्या बिबट्याच्या बचाव कार्यासाठी वनविभागाच्या विविध विभागातील सुमारे शंभर कर्मचारी सहभागी झाले. वनविभागाच्या मदतीला इतरही यंत्रणा काम करीत होत्या, मात्र तरीही बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. शिवाय काही नागरिक जखमी झाले. हे या बचाव कार्यातील वनविभागाचे अपयश आहे का? याबाबत उपवन संरक्षक अधिकारी राहुल पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले, मात्र पाटील यांनी या मुद्दयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
फणसाडमध्ये दहा बिबटे
नागाव येथे बिबट्या आला कोठून याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. नागाव येथे दिसून आलेला बिबट्या हा फणसाड अभयारण्य परिसरातून आला असल्याची शक्यता काही वनअधिकारी व्यक्त करीत आहेत. तर फणसाडचे वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी सांगितले की, फणसाड वनक्षेत्रात सध्या नऊ ते दहा बिबटे आहेत. बिबटे हे आपला अधिवास क्षेत्र बदलत नाही. नागाव येथे आलेल्या बिबट्या फणसाड येथूनच आलेला हे आताच सांगता येणार नाही. बाबत वनविभाग तपास करीत आहे.