पेण : विधानसभा निवडणुकीनंतर आता अनेकांना आळंदी यात्रेची ओढ लागली असून उद्यापासून (26 नोव्हेंबर) सुरु होणार्या आळंदी यात्रेला जाण्यासाठी रायगड एसटी महामंडळाने 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत सहा दिवसांचा आळंदी यात्रा जादा बसेसचे नियोजन केले आहे. या यात्रेसाठी जाणार्या भाविकांनी सुखकर प्रवासासाठी जास्तीत जास्त आपल्या लाडक्या एसटीचाच वापर करावा, असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे.
निवडणुकीच्या काळात प्रशासनाला योग्य ती मदत करून मतपेट्या ने-आण आणि कर्मचारी मतदान केंद्रावर नेण्यासाठी चोख कामगिरी बजावल्यानंतर तातडीने दरवर्षी येणार्या श्री ज्ञानेश्वर महाराज उत्सव आळंदी यात्रेसाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. 23 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत सहा दिवस महाड, रोहा, मुरुड, माणगाव या आगारांमधून या जादा बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये 23 तारखेला 3 विभाग, 24 तारखेला 10 विभाग, 25 तारखेला 1 विभाग, 27 तारखेला 11 विभाग आणि 28 तारखेला 3 विभागातून या बसेस आपल्या यात्रेकरूंना प्रवासाची सेवा पुरविणार आहेत. तर पेण, कर्जत, अलिबाग आगारातून प्रत्येकी दोन बसेस वाहतुकीकरीता 26 नोव्हेंबर रोजीच वस्तीला पाठविण्याचा निर्णय रायगड एसटी महामंडळाने घेतला आहे.
यामध्ये महाड आगारातून 2, रोहा आगारातून 8 बसेस, मुरूड आगारातून 4 बसेस तर माणगाव आगारातून 14 बसेस अशा एकूण 28 बसेस या सहा दिवसांच्या कालावधीत भाविकांच्या प्रवाशी सेवेसाठी रायगड एसटी महामंडळाने आळंदी यात्रा जादा गाडी या नावाने आरक्षित केल्या आहेत.
निवडणुकीतील बसेसची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आम्ही आळंदी यात्रेसाठी रायगड विभागाच्या माध्यमातून 28 जादा बसेसची व्यवस्था केली आहे. माझी रायगड जिल्ह्यातील सर्व भाविक प्रवाशांना विनंती आहे की, सुखरूप आणि सुरक्षित, कमीत कमी ? प्रवास करण्यासाठी आपण आपल्या हक्काच्या लालपरीचा म्हणजेच एसटीचाच प्रवास करावा आणि एसटी महामंडळाला सहकार्य करावे.
- दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड