

महाड ः पारंपारिक पद्धतीने बारा बलुतेदरांच्या मार्फत समाजामध्ये होणार्या व्यवसायाची परंपरा महाड तालुक्यातील अकले या गावी बुरुड समाजाकडून जोपासली जात असून प्रतिवर्षी गणेशोत्सव काळात या ठिकाणी घरोघरी सुपे करण्याची पद्धत सुरू आहे. महाड तालुक्यातील आकले गावांमध्ये गौरी-गणपती सणानिमित्त घरोघरी सुपे तयार करण्याची लगबग सुरु झाली असुन हजारों सूपे विक्रीसाठीही बाजारात रवाना झाली आहेत. शेकडों वर्षांची सूपे व बांबूच्या विणकामाची परंपरा यावर्षीही तितक्याच उत्साहाने गावात जोपासली जात आहे.
गणेशोत्सवात गौरी गणपतीच्या पूजेसाठी तसेच ओवशासाठी पारंपारिक पद्धतीने विणलेल्या सुपांना वेगळे महत्व व मोठी मागणीही असते. भक्तांची ही मागणी पूर्ण करण्याचे काम महाड तालुक्यातील आकले गावातील विणकाम कारागीर शेकडों वर्षांपातून करत आहेत.
बारा बलुतेदारांमध्ये असलेल्या बुरुड समाजाचा बांबू विणकाम हा प्रमुख व्यवसाय. महाड तालुक्यातील आकले हा पारंपारिक व्यवसाय जपला जातो या गावातील सुमारे 30 कुटुंबांमध्ये हा व्यवसाय चालतो. गावातील अनेक घरांच्या पडवीमध्ये नाहीतर ओसरीवर बांबूचे कातरकाम करणारे, विणकाम करणारे कारागीर , महिला गणेशोत्सवात सुपे विणण्याच्या कामांमध्ये व्यस्त असलेल्या दिसत आहेत.
येथील महिलांनी सरस्वती व राजमाता जिजाऊ असे महिला बचत गट स्थापन करुन त्यातून आपले घरकाम सांभाळत बांबूच्या विणकामातून आपल्या कुटूंबाला हातभारही लावत आहेत. बांबू पासून विणकाम केलेल्या आकले येथील सुपांना आजही तेवढीच पसंती आहे. येथील सूपे रायगड जिल्हा प्रमाणेच रत्नागिरी, मुंबई, पुणे,सातारा,सुरत व बडोदा या भागांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे ग्रामस्थ शैलेश माने यांनी सांगितले.
आकले गावातील बुरुड समाज सुपे, आसने, दुरडी, हारे, परडी, टोपल्या वर्षभर तयार करत असतात. परंतु गणेशोत्सवात हा व्यवसाय भरभराटीस येतो. गौरीसाठी ओवशाकरता सुपांची फारच मोठी मागणी असते. आकले गावात वर्षभरात 70 ते 75 हजार सूपे बनवली जातात तर इतर विणकामाच्या लहान-मोठ्या वस्तू या गावांमध्ये तयार केल्या जातात.
बांबूचे विणकाम करणार्या कारागिरांना स्वतःची बांबू बाग नाही .बांबू त्यांना विकत आणावा लागतो. एका बांबूच्या तुकड्यापासून दोन सुपे तयार केली जातात .बांबूचा तुटवडा आणि प्लास्टिकच्या सुपांचे झालेल्या अतिक्रमणामुळे या पारंपारिक व्यवसायालाही आव्हानाला सामोरे जावे लागत असले तरीही सुपांचा दर्जा राखला जात आहे.
सूपांमध्ये विविधता
सुपांमध्ये वेगवेगळ्या आकाराची तसेच एकेरी, दुहेरी, रूमानी, कात्री, फुलवटी ,नवघटी, सोळाबंदी ,सुपले अशा वीणकाम प्रकारची सूपे तयार करून विक्रीसाठी पाठवली जातात. धार्मिक व पुराणांमध्ये सोळाबंदी सुप पवित्र मानले जाते. त्यामुळे त्याला विशेष मागणी आहे. आकले गावातील सुपे हाताने तयार केली जात असल्याने एका दिवसात तीन ते चार सुपे एक व्यक्ती तयार करते. हाताने बनवल्यामुळे या सुपांना विशेष ओळख मिळाली आहे. सध्या बाजारामध्ये आकले गावचे सूप 250 - 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
आमच्या गावामध्ये पिढ्यानपिढ्या आम्ही हा व्यवसाय करत आहोत. बांबू व्यवसायातील नवनवीन कला अवगत करण्यासाठी प्रशिक्षण तसेच बांबू विकास मंडळाच्या योजना कारागिरांना मिळाला तर त्यांना फायदा होईल.
शैलेश माने, ग्रामस्थ