

पनवेल : एअर इंडियाच्या अहमदाबाद येथून लंडनला जाण्यासाठी टेकऑफ घेतलेल्या बोईंग विमानास 12 जून रोजी अपघात झाला होता. त्यास आता महिना लोटला आहे. एअर इंडियाने या विमान अपघातातील मृतांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची तात्पुरती मदत जाहीर केली होती. तर टाटा सन्सने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणा केवळ कागदावरचं राहिल्या असून पनवेल तालुक्यातील न्हावे गावात राहाणारी या विमानातील मृत क्रु मेंबर मैथिली मोरेश्वर पाटील हीच्या कुटूंबास एक रुपयाची देखील मदत अद्याप पोहोचलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यातच मृत मैथीलीचे वडिल मोरेश्वर पाटील यांना कामावरुन काढून टाकण्याची नोटीस ओएनजीसीमधील ते नोकरीकरित असलेल्या कंत्राटदार कपंनीने दिली आहे.
एअर इंडियामध्ये क्रु मेम्बर म्हणून काम करणार्या मैथिलीला एअर होस्टेस होण्याकरिता तीच्या वडिलांनी पदरमोड करुन सर्व खर्च केला होता. एअर होस्टेस होण्याच मैथीलीचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता त्यांनी सर्व ते केले आणि तीचे एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने तीच्यासह सर्व पाटील कुटूुंबीय सुखावले होते. त्या नंतर एअर इंडीयामध्ये मैथिलीची एअर होस्टेसपदी निवड झाली आणि पाटील कुटूंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. मैथिली कमावती झाल्यामुळे कुटूंबियांना मोठा आर्थिक आधार प्राप्त झाला होता. मात्र मैथिलीच्या या अपघाती मृत्यूने पाटील कुटूंब पूर्णपणे कोलमडून गेले होते.
मैथिलीच्या अपघाती मृत्यू नंतरउरण, पनवेल तसेच इतर ठिकाणच्या नेत्यांनी मैथीलीच्या घरी भेट दिली, सर्वांनी सहानूभूती व्यक्त केली होती. आपल्या लेकीच्या अचानक आपल्यातून निघून जाण्याच्या दुःख धक्क्यातून तीचे वडिल अद्याप सावरलेले नाहीत. त्याच बरोबर मैथिलीच्या मृत्यू नंतरच्या कागदपत्रांच्या पुर्तता आणि अन्य आवश्यक कामांकरीता मैथिलीच्या वडीलांनी कामावरुन रजा घेतली होती. मात्र आत्ता तिच्या वडिलांना कामावरून काढून टाकल्या बाबतची नोटीस कंत्राटदार कंपनीकडून मिळाल्याने दुसरा मोठा हादरा पाटील कुटूंबास बसला. ते आर्थिक संकटात सापडले असल्याची माहिती मैथिलीचे मामा जितेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.
मैथिलीच्या अपघाती मृत्यू नंतर एअर इंडियाकडून घोषीत आर्थिक मदत खरतर एक महिन्यात पाटील कुटूुंबास पोहोचणे आवश्यक होते. ती लवकरच पोहोचेल अशी आशा देखील मैथिलीचे मामा जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. परंतू दरम्यान गेल्या महिन्याभरात मृत मैथिलीच्या कुटूंबाचे काय झाले हे पाहण्याकरिता शासनाचा कोणीही प्रतिनीधी देखील पोहोचलेला नाही. घटना घडते तेव्हा शासन, प्रशासन आपल्या सोबत आहे अस सांगणार्यापैकी कोणीही पाटील कुटूंबाकडे परत फिरकलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.